हडपसरच्या बाहेरचा उमेदवार दिला तर हडपसर विकास आघाडी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 19:19 IST2024-10-27T19:18:48+5:302024-10-27T19:19:03+5:30
आज मुंबई येथे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला.

हडपसरच्या बाहेरचा उमेदवार दिला तर हडपसर विकास आघाडी होणार
हडपसर: हडपसरला आघाडीचा उमेदवार हा हडपसर मधीलच हवा. म्हणून आघाडीतील नाराज इच्छुकांनी कंबर कसली असून सध्या घोषित केलेला उमेदवार देण्यापेक्षा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा. अन्यथा हडपसर विकास आघाडी करून उमेदवार दिला जाईल, असा इशारा दिला आहे.
2002 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिलीप तुपे व दत्तोबा ससाने यांनी हडपसर विकास आघाडी नावाने पॅनल उभे केले होते. तो प्रयोग यशस्वी झाला होता. यावेळी सुद्धा अशाच प्रकारे विकास आघाडी स्थापन करून हडपसर विधानसभेसाठी उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षातील इच्छुकांनी खूनगाठ बांधलेली आहे. त्यांच्यासोबत या पक्षातील बहुतांश नगरसेवक सुद्धा दिसत आहेत. आज मुंबई येथे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला.
अमोल कोल्हे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले, ते वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना पोहोचवणार आहेत. आमच्या मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास सर्व पक्षातील इच्छुकांनी व्यक्त केला. महादेव बाबर, योगेश ससाने, आनंद अलकुंटे, बाळासाहेब शिवरकर , निलेश मगर, समीर तुपे, बंडू गायकवाड असे तीनही पक्षातील इच्छुक आता एकत्र झाले आहेत. हडपसर मधून उमेदवारीचा फेर विचार झाला नाही तर, हडपसर विकास आघाडीचा प्रयोग यावेळेस हे सर्व इच्छुक आजमावणार असे दिसते. उद्यापर्यंत वाट पाहून परवा दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी यांनी केली आहे.