Video: 'मी फॉर्म खाल्ला नाही; भावनेच्या भरात फाटला गेला', पुण्यातील शिंदे गटाच्या 'त्या' उमेदवाराचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:29 IST2026-01-01T15:23:21+5:302026-01-01T15:29:13+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मीच अधिकृत उमदेवार असल्याचे सांगितले आहे. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

Video: 'मी फॉर्म खाल्ला नाही; भावनेच्या भरात फाटला गेला', पुण्यातील शिंदे गटाच्या 'त्या' उमेदवाराचे स्पष्टीकरण
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक ३६ मध्ये उमेदवारीवरून राजकीय रणधुमाळी चिघळली असून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
एकाच प्रभागात दोन उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळात शिवसेनेचे उद्धव कांबळे यांनी उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म फाडून थेट गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एबी फॉर्मसारख्या अधिकृत दस्तऐवजावर झालेल्या या कृतीमुळे निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. त्यानंतर कांबळे यांनी लोकमतशी संवाद साधताना फॉर्म खाल्ला नसल्याचे सांगितले आहे.
कांबळे म्हणाले, सगळीकडे बातम्या आल्या होत्या की, मी फॉर्म खाल्ला आहे, किंवा गिळून टाकला आहे. पण मी तसं काहीच केलं नाही, मला तेवढं कळतं. मी फॉर्म भरायला गेल्यावर मला कळलं की, तिथे अर्जाची छाननी सुरू आहे. आणि मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजले. मी त्यांना व्यक्तीश: ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी कोणताही काही संबंधही नाही, त्यांनी कुठून तरी फॉर्म मिळवला आणि सबमीट केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मीच अधिकृत उमदेवार असल्याचे सांगितले आहे. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. मी कार्यालयात पोहोचल्यावर मला कळलं कि, दुसरा कुणीतरी उमेदवार फॉर्म भरत आहे. तेव्हा भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला. मी ते १०० टक्के मान्य करतो की, माझी चुक झाली आहे. पण प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. मी एकनिष्ठ आहे. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असंही कांबळे यांनी सांगितलं आहे.