फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:01 IST2025-03-29T16:59:25+5:302025-03-29T17:01:03+5:30
हा मुख्यमंत्र्यांचा खासगी दौरा असल्याने यामध्ये राजकीय चर्चा होणार नाहीत, असा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला.

फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP Harshwardhan Patil: राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर विरोधकांच्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा सूर बदलला आहे. विधानसभेत पराभूत झालेले महाविकास आघाडीचे काही नेते सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज इंदापुरातील नीरा नरसिंहपूर इथं देवदर्शनासाठी येणार होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील हजर असल्याचे पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात हजर राहिल्याने चर्चा रंगताच स्पष्टीकरण देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. लक्ष्मी नरसिंह हे फडणवीस यांचे कुलदैवत आहे. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहोत. पण हा मुख्यमंत्र्यांचा खासगी दौरा असल्याने यामध्ये राजकीय चर्चा होणार नाहीत," असा खुलासा पाटील यांनी केला.
हर्षवर्धन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह नीरा नरसिंहपूर इथं हजर होते. याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "मी स्वतःच एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेले आहेत. मी काही पुढारी नेता नाही. आज सगळे जुने मित्र मला भेटले, राजकारणात सगळेच एकमेकांना भेटत असतात."
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून महायुतीचे तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी तिसऱ्यांदा पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. त्यातच राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार मोठ्या बहुमतासह सत्तेत आल्याने आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सत्तेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न आजच्या दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.