गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न - आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:50 IST2025-08-21T10:50:03+5:302025-08-21T10:50:57+5:30

यंदा गणेशोत्सवासाठी सात दिवसांची मुभा देण्यात आली असून, रात्री बारापर्यंत त्याचा आनंद घेता येईल

Efforts to get UNESCO cultural status for Ganeshotsav - Ashish Shelar | गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न - आशिष शेलार

गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न - आशिष शेलार

पुणे : राज्यातील गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे. त्यासाठी या उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा त्यासाठी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांमधून गणेशोत्सवाला युनेस्कोच्या सांस्कृतिक दर्जाची मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यामुळेच तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले. यंदा या उत्सवासाठी सात दिवसांची मुभा देण्यात आली असून, रात्री बारापर्यंत त्याचा आनंद घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून, सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे. त्यासाठी गणेश मंडळांच्या देखाव्यांमध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसास्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयांवर जनजागृती करण्याकरिता प्रोत्साहन द्यावे.

यंदा गणेशोत्सवासाठी ७ दिवस रात्री १२:०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, दिवसांबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मोठी गणेश मंडळे, गणेश मंदिरांच्या दर्शनासाठी थेट प्रक्षेपण करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करून उपक्रमाचे आयोजन करावे. भजनी मंडळांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून, याबाबतच्या संकेतस्थळाचे गुरुवारी (दि. २१) लोकार्पण करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून, शासकीय इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करून रोषणाई करावी. त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पीएमआरडीए, पोलिस व महावितरण यांनी प्रत्येकी पाच चौकांची जबाबदारी घ्यावी. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी.

Web Title: Efforts to get UNESCO cultural status for Ganeshotsav - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.