समोर मोठी शक्ती असतानाही अत्यंत चिवटपणे संघर्ष केला अन् लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली - युगेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:25 IST2025-12-26T16:25:07+5:302025-12-26T16:25:18+5:30
एकजुटीने, निर्धाराने निवडणूक लढविणाऱ्या आपल्या सर्व उमेदवारांचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी उमेदवारांचे कौतुक केले

समोर मोठी शक्ती असतानाही अत्यंत चिवटपणे संघर्ष केला अन् लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली - युगेंद्र पवार
बारामती : बारामती नगरपरिषदेची निवडणूक आपण महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, सहयोगी पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांनी एकत्र येऊन शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लढविली. निवडणूक एकत्रितपणे लढत असताना आपल्या काही उमेदवारांचा थोड्या मतांनी अगदी निसटता पराभव झाला. समोर मोठी शक्ती असतानाही आपण अत्यंत चिवटपणे संघर्ष केला. लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याचे काम केले. एकजुटीने, निर्धाराने निवडणूक लढविणाऱ्या आपल्या सर्व उमेदवारांचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी उमेदवारांचे काैतुक केले.
याबाबत सोशल मीडियावर पवार यांनी पोस्ट करीत संबंधितांचे काैतुक केले. या निवडणुकीत आपल्या आघाडीच्या पॅनलमधून प्रभाग क्रमांक १३ अ मधून आपल्या सहकारी आरती मारुती शेंडगे-गव्हाळे, प्रभाग क्रमांक १५ ब मधून यशपाल सुनील पोटे आणि प्रभाग क्रमांक ५ ब मधून वनिता अमोल सातकर हे तिन्ही उमेदवार बहुमताने विजयी झाले. या तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन! या प्रभागांतील सर्व मतदार बंधू-भगिनींचेही आम्ही मनापासून आभार मानतो. आपण निवडून दिलेले हे तिन्ही विजयी उमेदवार नगरपरिषदेच्या सभागृहात आपला आवाज बुलंद करतील, लोकशाहीची तत्त्वे जिवंत ठेवून बारामतीकरांच्या प्रश्नांना प्राधान्य देतील आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
आघाडीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास टाकून मतदारांनी जे भरभरून मतदान केले, आपुलकी दाखविली त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले शतशः ऋणी आहोत. आपले सर्व उमेदवार पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहतील, अशी ग्वाही देतो. ही फक्त सुरुवात आहे, आपण नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुढे जाण्याचा निर्धार करूया. आपण सर्वजण मिळून बारामती शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दक्ष राहून, सकारात्मक आणि विधायक कार्य करत राहूया, असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे.