Pune Ganpati: पुण्यात देखावे पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला! मध्यवर्ती भागात दर्शनासाठी लक्षणीय भाविक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 20:27 IST2025-08-30T20:25:27+5:302025-08-30T20:27:21+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी झाली होती. विशेषतः: गणपती दर्शनासाठी विद्यार्थी आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती.

Pune Ganpati: पुण्यात देखावे पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला! मध्यवर्ती भागात दर्शनासाठी लक्षणीय भाविक
पुणे: पावसाने घेतलेली विश्रांती आणि गौरींच्या आगमानाच्या एक दिवस आधी आलेला शनिवारचा " वीक ऑफ" याचे औचित्य साधून बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले. पुण्यातील विविध भागातील गणेश मंडळांनी साकारलेले भव्य दिव्य देखावे पाहण्यासाठी रात्री गर्दीने उच्चांक गाठला. रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी झाली होती. विशेषतः: गणपती दर्शनासाठी विद्यार्थी आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती.
रविवारी ( दि. ३१) घरोघरी गौरी आवाहन होणार आहे. तरीही गौरीच्या स्वागताची सर्व तयारी करून महिला वर्ग देखील देखावे पाहण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला होता. पुढच्या शनिवारी ( दि. ६) अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी केवळ याच आठवड्यातील शनिवार रविवार मिळाला असल्याने नोकरदार मंडळींनी देखील देखावे पाहण्याचा आनंद लुटला. नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाने साकारलेले केदारनाथ मंदिर, मुंजोबाचा बोळ तरुण मित्र मंडळाने ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव भेटीचा केलेला ऐतिहासिक देखावा तसेच कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळाने शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावरून सुटका हा साकारलेला जिवंत देखावा तसेच कुमठेकर रस्त्यावरील विश्रामबाग मित्र मंडळाचा कलकत्त्याचे दक्षिणेश्वर काली मंदिर असे देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. छत्रपती राजाराम मंडळाच्या संताच्या पादुका दर्शनाचा लाभही पुणेकर घेत होते. सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंडळाने दहीहंडीच्या देखावा साकारला हा देखावा बघण्यासाठी गर्दी झाली होती. याशिवाय मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई, भाऊ रंगारी यांच्या दर्शनासाठीही संपूर्ण परिसर गर्दीने फुलला होता. शनिवार पेठ येथील जय हिंद मित्र मंडळाने श्री आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तीपीठांचा देखावा सादर केला आहे हे पाहण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पुणेकरांनी देखावे पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे मध्यवर्ती पेठांसह टिळक रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. टिळक रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने लगेचच विभागाला माहिती कळवली. मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. नागनाथ पार या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. रविवारी ( दि. 31) गौरी आवाहनानंतर देखील सायंकाळी पुणेकर देखावे पाहण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे.