पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:36 IST2025-12-29T14:35:48+5:302025-12-29T14:36:30+5:30
BJP Pune PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे.

पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने बंडखोरीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अशातच भाजपाने पुण्यात उमेदवार यादी काही केल्या जाहीर केलेली नाही, परंतू सकाळीच उमेदवारांना अर्ज भरण्याचा मेसेज पोहोचविण्यात आला आहे. यामुळे तयारीत असलेल्या सुमारे ८० उमेदवारांनी आज अर्ज भरण्यासाठी महापालिकेची कार्यालये गाठण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाचे म्हणजे या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आलेले असले तरीही काहींना एबी फॉर्म मात्र देण्यात आलेला नाहीय, असे समजते आहे. तो उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत देण्यात येणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे. असे असले तरीही आपल्या जागी कोणाला उमेदवारी मिळाली, याची कुणकुण इतर इच्छुकांना लागलेली आहे.
एबी फॉर्म का लागणार नाही...
निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की एखाद्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरताना पक्षाचा बी फॉर्म सोबत जोडण्याची गरज नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत बी फॉर्म हा द्यावाच लागतो. जो उमेदवार पक्षाचा बी फॉर्म घेतो, तोच अधिकृत उमेदवार मानला जातो आणि त्यालाच पक्षाचे चिन्ह दिले जाते.
वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कल
अगदी वेळेवर बी फॉर्म देण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे, त्यांच्यापैकी जे तगडे उमेदवार आहेत ते लगेच इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवू शकतात. तशी संधी त्यांना मिळू नये म्हणूनही वेळेवर बी फॉर्म देण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. भाजपने एकाही महापालिकेसाठी अशी यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे.