पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:43 IST2026-01-01T14:42:57+5:302026-01-01T14:43:31+5:30
Pooja More PMC Election 2026: या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असं त्यांनी सांगितले.

पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
पुणे - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक २ मधून पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती. अखेर भाजपा कार्यकर्त्यांनी उघडलेल्या मोहिमेनंतर पूजा मोरे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.
पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात होते. त्यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या की, माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतले. कोर्टाच्या चकरा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे या परिस्थितीतून मी पुढे आलीय. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही. ते भाग्य माझ्या नशिबात आले होते. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असं त्यांनी सांगितले.
तसेच मी लढणारी मुलगी आहे. मी संघर्ष करत राहणार. माझा भाजपात प्रवेश झाला आहे. मला पक्षाची उमेदवारीही मिळाली होती. मी हिंदू धर्म संस्कृतीत पती हा आपल्यासाठी देवासारखा असतो. माझं १०-१५ वर्षापूर्वीचं आयुष्य पूर्ण वेगळे होते. मी ग्रामीण भागात वाढलीय. कारखानदाराच्या विरोधात मी शेतकऱ्यांचा लढा लढला आहे असं पूजा यांनी म्हटलं.
दरम्यान, मला हिंदुत्व शहरात आल्यावर कळायला लागले. पहलगाम हल्ल्यानंतर मी जी प्रतिक्रिया दिली तेव्हा ती लगेच दिली होती. परंतु जेव्हा मी त्यातील पीडितांना भेटले, लोकांना भेटले तेव्हा धर्म विचारूनच हा हल्ला झाला हे मला कळले. तेव्हा हिंदू म्हणूनच मारण्यात आले होते असं मी प्रतिक्रिया दिली. मात्र माझा आधीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राहुल गांधींसोबतचा फोटो व्हायरल होतो. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. भारत जोडो यात्रा जेव्हा मराठवाड्यात आली तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी मी त्यांना भेटले. कापसाला भाव मिळाला पाहिजे. आयात निर्यात धोरणावर काम केले पाहिजे असं मी त्यांना म्हटले. परंतु माझा तो फोटोही व्हायरल केला जात आहे. परंतु मला यातून बाहेर पडायचे आहे. मी भाजपाची कार्यकर्ता आहे. मला हिंदुत्वासाठी काम करायचे आहे असंही पूजा मोरे यांनी सांगितले.