पुण्यात भाजपकडून बिडकर यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल; कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:55 IST2025-12-29T13:54:42+5:302025-12-29T13:55:48+5:30
पुण्यात भाजपने १०० जणांची यादी जाहीर केली असून त्यापैकी ८० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत

पुण्यात भाजपकडून बिडकर यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल; कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने उपस्थित होते.
पुण्यात भाजपने १०० जागा निश्चित केल्या असून एक यादी तयार केली आहे. आता त्याच यादीतील ८० उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यादी जाहीर न करता भाजपने थेट ८० जणांना एबी फॉर्म दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील अधिकृत भाजप उमेदवार म्हणून बिडकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्याबरोबरच प्रभाग २३ मधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तेही आज उमेदवारी दाखल करणार आहेत.
कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी
दिवंगत नेते गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्याबाबत भाजपने शब्द दिला होता. कुणाल टिळक यांना विधानसभेत उमदेवार मिळणार होती. मात्र त्यावेळी पुन्हा थांबवून त्यांना महापालिका निवडणुकीत संधी देऊ असा शब्द देण्यात आला. तसेच गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनाही महापालिकेला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांना प्रभाग क्रमांक २५ मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता या शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी जे इच्छुक अर्ज करतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. पण, मंगळवारी अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र मिळेलच याची खात्री नाही, असे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे.