मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांना बरोबर घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 21:00 IST2025-12-24T20:58:22+5:302025-12-24T21:00:32+5:30
पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल

मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांना बरोबर घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न - सुप्रिया सुळे
पुणे : पुणे महानगपालिका निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि नेत्यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलं असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच काल दोन्ही पक्षाच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे, त्याबाबत पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुण्यात पाणी, कचरा, वाहतूक कोंडी, वायू-जल प्रदूषणासारखे प्रश्न गंभीर आहेत. पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादी, उद्धवसेना, मनसे व काँग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुळे पुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. पूर्ण शंका-निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सर्व जबाबदारी माझी आहे.
‘मन की बात’ जाणून घेतली, अंतिम निर्णय शरद पवार घेणार
पुणे महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.