Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात रात्री १२ पर्यंत परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे गणेश मंडळांना गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 21:50 IST2022-09-07T21:47:15+5:302022-09-07T21:50:01+5:30
पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे गणेश मंडळांना गिफ्ट...

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात रात्री १२ पर्यंत परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे गणेश मंडळांना गिफ्ट
धायरी : उपनगरातील गणेश मंडळे ही शहरातील मंडळांच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी गणेश विसर्जन करीत असतात. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उपनगरातील मंडळांना परवानगी असल्याने ही वेळ वाढवून देण्याची मागणी उपनगरातील स्थानिक मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जनतेचे सरकार आहे, असे सांगत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणत वेळ वाढवून देत असल्याचे सांगितले.
बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथील संकल्प मित्र मंडळाच्या गणेश दर्शनासाठी ते आले असताना त्यांनी थेट मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे जनतेचे सरकार आहे. जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल. निर्बंधमुक्त गणेशोत्सव केला आहे. रात्री १२ वाजेपर्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खासदार श्रीरंग बारणे, उपशहर प्रमुख नीलेश गिरमे, संकल्प प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधिका दशरथ गिरमे आदी उपस्थित होते.