Administration ready for vote counting | मतमाेजणीसाठी प्रशासन सज्ज ; नेहमीपेक्षा लागणार दाेन तास अधिक
मतमाेजणीसाठी प्रशासन सज्ज ; नेहमीपेक्षा लागणार दाेन तास अधिक

पुणे : येत्या 23 तारखेला लाेकसभेच्या निवडणुकीची मतमाेजणी हाेणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे, बारामती, मावळ, शिरुर या मतदारसंघाची मतमाेजणी पुण्यात दाेन ठिकाणी हाेणार आहे. मावळ आणि शिरुरची मतमाेजणी बालेवाडीतील शिवछत्रपती स्पाेर्ट्स सेंटर येथे हाेणार आहे, तर पुणे आणि बारामती मतदारसंघाची मतमाेजणी काेरेगाव पार्क येथील धान्य गाेदामात हाेणार आहे. मतमाेजणीच्या ठिकाणापासून 200 मीटर पर्यंत कुठलिही वस्तू किंवा माेबाईल सुद्धा घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच यंदा प्रत्येक विधानसभेमधील पाच व्हिव्हीपॅटच्या स्लिपची माेजणी हाेणार असल्याने नेहमीपेक्षा दाेन तास उशीर हाेण्याची शक्यता असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

लाेकसभेच्या निवडणुकींचा निकाल येत्या 23 तारखेला जाहीर हाेणार आहे. यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. मतमाेजणी कक्षामध्ये उमेदवाराला माेबाईल तसेच कुठलिही वस्तू घेऊन जाता येणार नाही. त्याचबराेबर प्रत्येक टेबलला केवळ एक एजंट राजकीय पक्षांना उभा करता येणार आहे. युती, आघाडी आणि इतर याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या ठिकाणीच उमेदवारांना आपली वाहने लावता येणार आहेत. पहिल्या फेरीची आकडेवारी 9.30 ते 10  वाजेपर्यंत स्पष्ट हाेऊ शकणार आहे. परंतु संपूर्ण मतमाेजणी हाेण्यासाठी काहीसा उशीर हाेण्याची शक्यता आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील कुठल्याही पाच व्हिव्हीपॅटच्या स्लिपची माेजणी करण्यात येणार आहे. ही माेजणी झाल्यानंतर पुन्हा त्या व्हिव्हीपॅटमशीन मध्ये टाकून मशीन सील करण्यात येणार आहे. 

याबराेबरच उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी भाेजन व अल्पाेपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दरपत्रकात निश्चित केल्ल्या दरानुसार कुपनद्वारे त्यांना भाेजन व अल्पाेपहाराची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. त्याचबराेबर सर्व उमेदवार प्रतिनिधींना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ओळखपत्र धारक उमेदवार प्रतिनिधींनाच मतमाेजणी केंद्राच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर हे चार मतदारसंघ मिळून एकूण 2372 पाेलिंग स्टेशन हाेते. यासाठी एकूण 106 मतमाेजणी टेबल असणार असून एकूण 22 फेऱ्यांमध्ये मतमाेजणी हाेणार आहे. 
 


Web Title: Administration ready for vote counting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.