Pune Crime: स्वामीचिंचोली परिसरात युवकावर कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:48 IST2023-08-11T16:47:51+5:302023-08-11T16:48:32+5:30
हा तरुण जखमी झाला असल्याने त्याच्यावर बारामती येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

Pune Crime: स्वामीचिंचोली परिसरात युवकावर कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी
दौंड (पुणे) :दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली येथील एका पेट्रोल पंपाजवळ तरुणावर कोयत्याने वार करून त्याची लुटमार केली. या घटनेत विशाल धुमाळ हा तरुण जखमी झाला असल्याने त्याच्यावर बारामती येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवार ( दि. ९) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शिवम कांबळे आणि चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी राहुल ढवळे ( वय २९, रा. मदनवाडी, ता. इंदापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडल्याच्या एक दिवस अगोदर झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. मंगळवार (दि.८) रोजी फिर्यादी राहुल ढवळे याचा चुलत भाऊ अक्षय ढवळे हा दुचाकीवरून शेतात जात असताना अक्षयला अनोळखी व्यक्तींने दुचाकीचा कट मारला. दरम्यान, अक्षयला कट मारणारे दुचाकीस्वार पुन्हा मागे आले आणि अक्षय ढवळे याला दमदाटी करून शिवीगाळ केली या घटनेची माहिती राहुल ढवळे याला मिळतातच तो घटनास्थळी आला. यावेळी दोन ते तीन अनोळखी तरुण होते पैकी एकाच्या हातात कोयता होता. यावेळी राहुलने एकमेकांना समजून सांगितल्यानंतर प्रकरण मिटले याच दिवशी सायंकाळी राहुल ढवळे याच्या मोबाइलवर शिवम कांबळे याने संपर्क साधून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि दमदाटी केली. बुधवार ( दि.९ ) रोजी सायंकाळी राहुल ढवळे यांच्या मोबाइलवर शिवम कांबळे याने संपर्क साधला आणि म्हणाला मी दारूच्या नशेत होतो आपल्या किरकिर झाली तेव्हा मला तुझी माफी मागायची आहे. तेव्हा मी बाहेर आहे, असे सांगितले.
राहुल आणि विशाल हे दोघे स्वामीचिंचोली परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ उभे होते. यावेळी पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी राहुल आणि विशाल याला पकडून धरले त्यानंतर शिवम कांबळे याने कोयत्याने विशालच्या पोटावर वार केला. तसेच काही अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडून घेत पोबारा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत अधिक तपास करीत आहे.