PMC Election 2026: २,७०३ निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यात १७४ अर्ज बाद, आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनाही दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:53 IST2026-01-01T09:52:49+5:302026-01-01T09:53:13+5:30
निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच होता

PMC Election 2026: २,७०३ निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यात १७४ अर्ज बाद, आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनाही दिलासा
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३ हजार ०५९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली. महापालिकेच्या १५ पैकी १४ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेल्या अर्ज छाननीमध्ये १७४ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे २ हजार ७०३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. पालिका निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच होता. यामुळे अर्ज भरण्याच्या दिवशी काही पक्षांनी प्रवेश देऊन ऐनवेळी उमदेवारी दिली. त्यामुळे जागा वाटपाचा गाेंधळ सुरू असतानाच सर्वच पक्षांकडून एकाच ठिकाणी अनेक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी जागा वाटपाचा गाेंधळ आणि एबी फॉर्मचा घोळ मिटेना, अशी स्थिती होती. त्यामुळे २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट हाेणार आहे.
भोसले, जगताप, बागवे, धेंडे यांचे अर्ज वैध
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर वाकडेवाडीमधील भाजपच्या उमेदवार रेश्मा अनिल भोसले यांच्याकडे मालमत्तेची थकबाकी असल्याचा आक्षेप ‘आप’च्या उमेदवाराने घेतला होता. त्यावर सुनावणी झाली. त्यात रेश्मा अनिल भोसले यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे रेश्मा भोसले यांना दिलासा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक ३६ मधील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे उमेदवार सुभाष जगताप यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २ मधील राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. पण, ही हरकत फेटाळून धेंडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांच्या उमेदवारी अर्जावरही घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. या हरकतीवरील सुनावणी प्रलंबित ठेवली आहे.
एका क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी छाननी संथगतीने
पुणे महापालिकेच्या १५ पैकी १४ क्षेत्रीय कार्यालयामधील उमेदवारी अर्जाच्या छाननीची माहिती उपलब्ध झाली आहे. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये उशिरापर्यत उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होती. त्यामुळे ही आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
ए फॉर्म जोडला नसल्याचा आक्षेप
उद्धवसेनेच्या उमेदवारांनी अर्जासमवेत बी फॉर्म जोडला, मात्र ए फॉर्म जोडला नसल्याचा आक्षेप भाजपच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्यात आला होता. त्यावर उद्धवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे अगोदरच जमा केले असल्याचे पत्र महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांना पाठविले. त्यामुळे उद्धवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्याचा प्रकार टळला.
