कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:21 IST2024-10-14T13:21:40+5:302024-10-14T13:21:53+5:30
केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आले असून खासदार, आमदारांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी

कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय?
पुणे: पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या शंभर मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी शनिवारवाडा आणि पाताळेश्वर परिसरातील जुन्या वाड्यांची आणि काही इमारतींची पुनर्निर्मिती थांबली आहे. केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत. खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कसब्यातील १ लाख नागरिक आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहेत, असा इशारा शनिवारवाडा कृती समितीने दिला आहे.
शनिवार वाड्याच्या भिंतींना नवीन बांधकामामुळे काही तोटा होणार नाही, हे सद्यस्थितीला दिसून येत आहे. तरीही येथे बांधकामाला परवानगी दिली जात नाही. येथील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आगीचा बंब, रुग्णवाहिका या अगदी प्राथमिक सुविधांपासूनदेखील वंचित आहेत. या प्रश्नासाठी उपोषण करण्यासही पोलिस परवानगी देत नाहीत. हतबल नागरिक, उद्दाम सरकार, पालिकेचा संतापजनक कारभार यामध्ये येथील नागरिकांची कोंडी होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कसब्यातील १ लाख नागरिक या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे शनिवारवाडा कृती समितीच्या अनुपमा मुजुमदार यांनी सांगितले.