राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:30 AM2019-04-19T06:30:40+5:302019-04-19T06:31:42+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दहा मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले.

62 percent polling in the state; EVM Impairment Complaint | राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दहा मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. तापमानाच्या पाºयाने चाळिशी गाठली असताना अत्यंत उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे मतदारांनी रांगा लावून आपला हक्क बजावला. राज्यात हिंसाचाराची कुठेही घटना घडली नसली तरी तब्बल ३४६ ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया रखडली गेली.
विविध कारणांसाठी सुमारे २४ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने त्या गावांतील मतांवर पाणी पडले. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मतदारांनी मतदान करतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तसेच संजय धोत्रे (अकोला), प्रतापराव जाधव (बुलडाणा), आनंदराव अडसूळ (अमरावती), संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), डॉ. प्रीतम मुंडे (बीड) या खासदारांसह १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी यंत्रबंद झाले. परभणी जिल्ह्यात मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर असलेले एक किराणा दुकान प्रशासनाने बंद केल्याने चिडलेल्या दुकानदारासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात जीपचालक अमोल गायकवाड जखमी झाला.
उस्मानाबादेत १० जणांवर गुन्हे
मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याने उस्मानाबाद व मुरुम येथे १० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत़ मतदान केंद्रात मोबाईल नेल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे़ केलेले मतदान सोशल मीडियावर पोस्ट करण्याची जणू स्पर्धाच लागली होती़ पहिले प्रकरण प्रवीण वीर पाटील याने मतदान करतानाचा व्हीडिओ फेसबुकवर लाईव्ह केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली़
बुलडाणा: ६२.५० टक्के मतदान
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार ६२.५० टक्के मतदान झाले. मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनीटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे १०६ सहा ठिकाणी मतदान यंत्रे बदलावली लागली. पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातंर्गत आदिवासी बहूल भागातील भिंगारा आणि चाळीस टपरी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
लातूर: तीन गावांचा बहिष्कार
लातूर मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले असून, अंतिम आकडेवारी रात्री उशिरा हाती येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. रस्ता, पीकविमा व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सुनेगाव-शेंद्री, तळेगाव (बोरी) आणि गोटेवाडी या तीन गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला, तर आनंदवाडी, पिरु पटेलवाडी, रामघाट तांडा येथील मतदान केंद्रांकडे दुपारपर्यंत कोणीही फिरकले नव्हते.
बीडमध्ये ६३ टक्के मतदान
बीड लोकसभा मतदार संघात सुमारे ६३ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात १३ कंट्रोल युनिट, ३९ बॅलेट युनिट व २४ व्हीव्हीपॅट असे ७६ यंत्र तांत्रिक कारणांमुळे बदलावे लागले, तर रस्त्याच्या कारणावरुन शिरुर तालुक्यातील बंगळवाडी- निमगाव येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
नांदेडमध्ये ६५ टक्के मतदान
नांदेड लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६३़१२ टक्के मतदान झाले असून साधारण ६५ टक्क्यापर्यंत मतदान जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केली़ हदगाव तालुक्यातील तरोडा, विठ्ठलवाडी, चोरंबा बु़, चोरंबा खुर्द़, कुसळवाडी, खरबी आणि केदारगुडा तर देगलूर तालुक्यातील पुंजरवाडी आणि नायगाव तालुक्यातील मांजरमवाडी या गावांनी बहिष्कार टाकला.
अकोल्यात ६० टक्के मतदान
अकोला मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५४.७३ टक्के मतदान झाले. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर ही टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केली आहे. पाच गावांमध्ये ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाला होता तर बाळापूर तालुक्यातील कवठा या मतदान केंद्रावर मतदान यंत्र फोडण्याचा प्रकार एका मतदाराने केला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती:६१ टक्के मतदान
अमरावती मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५५.२७ टक्के मतदान झाले. सकाळी व दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. मतदानाचे सहा वाजता दरम्यान अनेक ठिकाणी रांगा होत्या. अंतिम टक्केवारीला वेळ लागणार आहे. मात्र, ६० ते ६२ या दरम्यान अमरावती लोकसभेची टक्केवारी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांनाही मागणीनुसार व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय १९९ मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले.
>सोलापूरमध्ये मतदान प्रक्रिया रखडली
सोलापूर मतदारसंघातील दीडशे केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्रणेतील बिघाडामुळे मतदानाची प्रक्रिया गुरुवारी सकाळी रखडली. पर्यायी यंत्रांची व्यवस्था झाल्यानंतर मतदान पार पडले. या मतदारसंघात सुमारे ५८ टक्के मतदान झाले. काँग्रेस अथवा वंचित आघाडीच्या उमेदवारास मतदान केल्यानंतर ते भाजपच्या उमेदवारास जात असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केला. मात्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा आरोप फेटाळून लावला. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे १०० मीटरच्या आत आलेल्या मतदारांना पोलिसांनी लाठीहल्ला करून पिटाळून लावले. अक्कलकोट तालुक्यातील तीन आणि बार्शीतील वानेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान गुरुवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यातील पाच नवदांपत्यांनी मतदान करून लग्नाचा विधी पूर्ण केला.
>हिंगोलीत ६४ टक्के मतदान
हिंगोलीतील २८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६४ टक्के मतदानाचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला.
>पोलिसांच्या गाडीवर दगडफेक
परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे ६२.६४ टक्के मतदान झाले. तीन गावांमध्ये मतदानाचा हक्क बजावला गेला नाही. ९ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मशीन बंद पडल्या होत्या.
>या २४ गावांनी टाकला होता बहिष्कार
बुलडाणा : भिंगारा । लातूर : सुनेगाव-शेंद्री, तळेगाव (बोरी), गोटेवाडी ।
उस्मानाबाद : जेजला, धनेगाव, सौदणा, वाकडी । परभणी : ३ गावे ।
नांदेड : तरोडा, विठ्ठलवाडी, चोरंबा बु़, चोरंबा खुर्द़, कुसळवाडी, खरबी, केदारगुडा पुंजरवाडी आणि मांजरमवाडी । सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तीन आणि बार्शीतील वानेवाडी गाव


मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ २०१९ २०१४
सोलापूर ५८ ५५
लातूर ६३ ६२
उस्मानाबाद ६३ ६३
बीड ६४.८९ ६८
परभणी ६२.६४ ६४
हिंगोली ६४ ६६
नांदेड ६५ ६०
अमरावती ६१ ६२
अकोला ६० ५८
बुलडाणा ६२.५ ६१

Web Title: 62 percent polling in the state; EVM Impairment Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.