PCMC Election Results 2026: पिंपरीत चिंचवडमध्ये महिलाशक्ती जिंकली! भाजपच्या ४२, राष्ट्रवादीच्या १८, शिंदेसेना ३, अपक्ष १ महिला नगरसेविका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:04 IST2026-01-19T14:03:37+5:302026-01-19T14:04:01+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या ६४ जागांसाठी ३१७ महिला उमेदवार रिंगणात होत्या

PCMC Election Results 2026: पिंपरीत चिंचवडमध्ये महिलाशक्ती जिंकली! भाजपच्या ४२, राष्ट्रवादीच्या १८, शिंदेसेना ३, अपक्ष १ महिला नगरसेविका
पिंपरी : महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या ६४ जागांसाठी ३१७ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी भाजपच्या सर्वाधिक ४२, राष्ट्रवादी (अजित पवार) १८, शिवसेनेच्या ३ आणि एक अपक्ष महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. शहरातील ४७.१४ टक्के महिलांनी मतदान केले.
शहरातील १७ प्रभागांमध्ये भाजपच्या दोन्ही महिला उमेदवार निवडून आल्या आहेत, तर ५ प्रभागात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या दोन्ही महिलांनी माजी मारली आहे. शिंदेसेनेकडून प्रभाग १० या एकाच प्रभागात दोन्ही महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. ६४ अपक्ष महिला उमेदवारांपैकी प्रभाग क्रमांक २४ मध्ये केवळ शालिनी गुजर अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वर्षा भोसले यांचा २६२० मतांनी पराभव केला.
अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गातून महिलांची टक्कर
प्रभाग क्रमांक ८-अ मधून माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे राष्ट्रवादीकडून (अजित पवार) रिंगणात उतरल्या होत्या. त्यांची भाजपचे डॉ. सुहास कांबळे यांच्याशी अटीतटीची लढत झाली. मात्र, केवळ २५६ मतांनी पराभव पत्कारावा लागला. प्रभाग २०-अ मध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार) डॉ. सुलक्षणा धर व राष्ट्रवादीचे (अजित पवार) जितेंद्र ननावरे यांच्यात सामना रंगला होता. त्यामध्ये डॉ. धर यांचा ३,६२३ मतांनी पराभव झाला. प्रभाग ३०-अ मध्ये भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांची ७११ मतांनी हार झाली.
मतदारांमधील महिलांची टक्केवारी किती?
एकूण १७,१३,८९१ नोंदणीकृत मतदार आहेत. ९,०५,७२८ पुरुष, ८,०७,९६६ महिला आणि १९७ अन्य आहेत. यानुसार, मतदारांमधील महिलांची टक्केवारी ४७.१४ टक्के आहे. मतदानात ९,८९,०२६ मतदारांनी सहभाग घेतला. त्यात ४,६३,८२७ महिलांचा समावेश आहे. एकूण ५७.४१ टक्के महिलांनी मतदान केले.
मोठ्या मताधिक्क्याने विजय (कंसात मताधिक्य)
सारिका गायकवाड (भाजप : १६,०११), स्नेहा कलाटे (भाजप : १४,३४९), रेश्मा भुजबळ (भाजप : १४,२५७), श्रुती डोळस (भाजप : १३,५७४), हिराबाई घुले (भाजप : १२,९९२), अर्चना सस्ते (भाजप : १२,९१९), शैलजा मोरे (भाजप : १२,८६६)
कमी मतांनी विजय (कंसात मताधिक्य)
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सविता आसवानी (२१), प्रतीक्षा लांघी-जवळकर (५३४) व भामाबाई फुगे (७३४), कोमल काळे (भाजप : ६७३), योगिता बारणे (राष्ट्रवादी-अजित पवार : ४३९), अर्चना तापकीर (भाजप : ७४४), दीप्ती कांबळे (राष्ट्रवादी-अजित पवार : ७४५).