त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:13 IST2025-12-10T17:12:18+5:302025-12-10T17:13:05+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत

त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे
पुणे: पुण्यात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. रस्त्याने सहज जाताना ही कुत्री थेट अंगावर धावून चावा घेत आहेत. अनेकांना दुचाकीवरून जाताना कुत्री मागे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अपघातही झाले आहेत. भोसरीचे आमदारमहेश लांडगे यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडत प्राणी मित्रांवर निशाणा साधला आहे. सर्व मोकाट कुत्री या प्राणी मित्रांच्या घरी सोडा असं म्हणत लांडगे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
लांडगे म्हणाले, कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. काही प्राणी मित्र असे आहेत कि, माणसांना काय त्रास होतो हे त्यांना दिसत नाही. त्यांचे कुत्र्यांवर प्रेम आहे. पण ती ज्या माणसांना चावतात त्यांच्यावर यांचे प्रेम नाही. आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्र नाही. मी मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना सांगतो की, सगळी कुत्री त्या प्राणी मित्रांच्या घरी सोडा. त्यांना कळूदे कुत्र्यांचा चावा काय असतो. आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधिवेशनात सांगितले आहे.