PCMC Election 2026 :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:53 IST2026-01-01T13:52:34+5:302026-01-01T13:53:40+5:30
- बंडखोरीच्या धास्तीने ‘एबी’ फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे : राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट; कमालीची गुप्तता पाळून यादी जाहीर करण्यास उशीर

PCMC Election 2026 :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी
पिंपरी : महापालिका निवडणुकीत भाजपने आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप यांच्यासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले आहेत, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या २० आयारामांना उमेदवारी दिली आहे.
भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीच्या धास्तीने उमेदवारांचे एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले. पक्षाने १९ आयारामांना पायघड्या घातल्या आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या दोन माजी महापौर अपर्णा डोके, शकुंतला धराडे यांना भाजपने ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. दोन्ही पक्षांमध्ये शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. कमालीची गुप्तता पाळून, छाननी संपल्यानंतरही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले.
बंडखोरी टाळण्यासाठी खेळी
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपच्या आमदारांनी स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म जमा केले. परंतु, उमेदवारी नाकारल्याने माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, तसेच करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप यांना उमेदवारी डावलली.
या १९ आयारामांना उमेदवारी
राष्ट्रवादीमधून आलेले राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, उषा वाघेरे, शकुंतला धराडे, अपर्णा डोके, समीर मासूळकर यांच्या पत्नी शीतल, प्रसाद शेट्टी, प्रवीण भालेकर, जालिंदर शिंदे, अनुराधा गोफणे, आशा सूर्यवंशी, कुशाग्र अशोक कदम, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून आलेले राहुल कलाटे, उद्धवसेनेतून आलेले रवी लांडगे, अमित गावडे, मीनल यादव, संजय काटे, सचिन सानप यांच्या पत्नी रिटा सानप, काँग्रेसमधून आलेले सद्गुरु कदम यांना भाजपने उमेदवारी दिली.
या माजी नगरसेवकांना नारळ
माजी उपमहापौर केशव घोळवे, राजेंद्र गावडे, शशिकांत कदम, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सीमा चौघुले, माधवी राजापूरे, माधुरी कुलकर्णी, सुनीता तापकीर, अश्विनी बोबडे, निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, स्वप्निल म्हेत्रे, यशोदा बोईनवाड, अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, कोमल मेवानी, सारिका लांडगे, राजेंद्र लांडगे, निर्मला कुटे या माजी नगरसेवकांना डावलण्यात आले.
भाजप सोडलेले माजी नगरसेवक
सीमा सावळे, संदीप वाघेरे, वसंत बोराटे, अश्विनी जाधव, शेखर चिंचवडे, धनंजय काळभोर, अश्विनी चिंचवडे, भीमाबाई फुगे, संजय नेवाळे, प्रियंका बारसे, लक्ष्मण सस्ते, बाळासाहेब ओव्हळ यांनी भाजपला रामराम केला. भाजप प्रवेश करूनही संजोग वाघेरे, विनया तापकीर यांना उमेदवारी दिली नाही.