Municipal Election : उद्धवसेना ७१, काँग्रेस ३५, मनसे १९ आणि ‘रासप’ला ३ जागांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:30 IST2025-12-30T13:29:40+5:302025-12-30T13:30:42+5:30
‘वंचित’लाही जागा देणार : ‘मविआ’मध्येही जागावाटपाचा तिढा कायम; काँग्रेस-उद्धवसेनेत एकमताचा अभाव

Municipal Election : उद्धवसेना ७१, काँग्रेस ३५, मनसे १९ आणि ‘रासप’ला ३ जागांचा प्रस्ताव
पिंपरी : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवादही उघड होत आहे. निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना काँग्रेस, मनसे आणि उद्धवसेना यांच्यात जागावाटपावर एकमत न झाल्याने समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी रात्री उद्धवसेनेस ७१, काँग्रेसला ३५, मनसेला १९ आणि राष्ट्रीय समाज पक्षाला ३ जागा द्यायचा फॉर्म्युला तयार झाला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीलाही यातील काही जागा देण्यावर चर्चा सुरू होती.
महाविकास आघाडीत जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात प्रभागनिहाय वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला आहे. काँग्रेसकडून परंपरागत मतदारसंघ, संघटनात्मक उपस्थिती आणि मागील कामगिरीचा आधार घेत अधिक जागांची मागणी केली जात आहे. दुसरीकडे उद्धवसेनेकडून शहरातील प्रभाव, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि पक्षाची ओळख पुढे करत तडजोड नाकारली जात आहे.
या मतभेदांचा थेट फटका स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना बसत आहे. अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार संभ्रमात असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असतानाही उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्याने नाराजी वाढत आहे. काही ठिकाणी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असा दावा सुरू असला, तरी प्रत्यक्षात मात्र जागावाटप आणि निर्णयप्रक्रियेत एकसूत्रता दिसत नाही. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर नेतृत्वाने ठोस आणि वेळेत निर्णय न घेतल्याने आघाडीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसला ३५, मनसे १९ आणि ‘रासप’ला ३ जागा सोडण्यात आल्या आहेत. काही जागांवर काँग्रेसच्या आणि आमच्याही उमेदवारांचा दावा आहे. त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. - ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना
महाआघाडीची जागावाटपाची चर्चा सकारात्मक सुरू आहे. काही मोजक्या जागांचा तिढा आहे. तोही सुटेल. - मयूर जैस्वाल, उपाध्यक्ष, काँग्रेस