उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून उडणार झुंबड; पक्षांनी अजूनही जाहीर केले नाहीत अधिकृत उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:02 IST2025-12-27T18:00:46+5:302025-12-27T18:02:18+5:30
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election पक्षांकडून शेवटच्या क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची परंपरा लक्षात घेता अनेक इच्छुकांनी ‘सेफ साइड’ म्हणून अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवली आहे

उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून उडणार झुंबड; पक्षांनी अजूनही जाहीर केले नाहीत अधिकृत उमेदवार
पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून (दि. २३ डिसेंबर) उमेदवारी अर्जांचे वितरण आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, शुक्रवार (दि. २६) अखेर फक्त १३ जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही मंगळवारपर्यंत (दि. ३०) आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यापेक्षा राजकीय गणिते मांडण्यावरच सध्या अधिक भर दिसून येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार), (अजित पवार), शिवसेना (उद्धवसेना), (शिंदेसेना) यांच्यामध्ये अंतर्गत बैठका, सर्वेक्षणे, संभाव्य आघाड्यांची गणिते आणि स्थानिक समीकरणांवर चर्चा सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवार अक्षरशः ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत अडकले आहेत. तिकीट मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने अनेकांनी अर्ज तयार ठेवून शेवटच्या क्षणाची वाट पाहणे पसंत केले आहे.
शनिवारचा मुहूर्त नको..
आज शनिवार असल्याने आज अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे. रविवारी सार्वजनिक सुटी असल्यामुळे अर्ज स्वीकृती बंद राहणार असल्याने, उर्वरित केवळ सोमवार (दि. २९) आणि मंगळवार (दि. ३०) हे दोनच दिवस शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी, धावपळ आणि गोंधळाचे चित्र दिसण्याची शक्यता आहे.
सेफ साईड अपक्ष म्हणून अर्ज दाखल...
विशेष म्हणजे, पक्षांकडून शेवटच्या क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची परंपरा लक्षात घेता अनेक इच्छुकांनी ‘सेफ साइड’ म्हणून अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवली आहे. तिकीट मिळाल्यास अपक्ष अर्ज मागे घेण्याची, तर तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनच मैदानात उतरण्याची रणनीती आखली जात आहे. यामुळे अंतिम टप्प्यात अर्जांची संख्या झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत. प्रभागनिहाय पाहता विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि नवोदित उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. काही प्रभागांत पक्षांतर्गत नाराजी उघडपणे दिसून येत असून, संभाव्य बंडखोरीचे संकेतही मिळत आहेत. याचा थेट परिणाम उमेदवारी अर्जांच्या संख्येवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.