PCMC Election 2026 : समीकरणे बदलली...! निष्ठेला तिलांजली देत रंगला पक्षांतराचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:19 IST2026-01-01T13:18:59+5:302026-01-01T13:19:38+5:30
- भाजपमधील नाराज राष्ट्रवादीत (अजित पवार), तर राष्ट्रवादीतील नाराज शिंदेसेनेत; ऐनवेळच्या कोलांटउड्यांमुळे लढती अधिकच चुरशीच्या आणि अनपेक्षित वळण घेणाऱ्या ठरणार

PCMC Election 2026 : समीकरणे बदलली...! निष्ठेला तिलांजली देत रंगला पक्षांतराचा खेळ
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी इच्छुकांनी ऐनवेळी पक्षांतर करत उमेदवारी मिळविल्याने भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना या प्रमुख पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे अनेक प्रभागांतील लढती अधिकच चुरशीच्या आणि अनपेक्षित वळण घेणाऱ्या ठरणार आहेत.
प्राधिकरण-निगडी प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपचे मागील वेळचे उमेदवार व माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये प्रवेश करत उमेदवारी दाखल केली. यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी उपमहापौर राजू मिसाळ यांच्याशी त्यांची लढत रंगणार आहे. याच प्रभागात शिंदेसेनेच्या महिला शहर संघटिका सरिता साने यांनीही ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अर्ज दाखल केला.
केशवनगर-चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असून, भाजपला या प्रभागात ताकद मिळाली. या प्रभागातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
आकुर्डी-मोहननगर प्रभाग क्रमांक १४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर बळ मिळाले.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी भोंडवे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये प्रवेश केला असून, त्यांच्या पत्नी आशा भोंडवे यांनी प्रभाग १६ मधून उमेदवारी दाखल केली आहे. चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपला धक्का बसला आहे. कारण, शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत थेट भाजपचे उमेदवार सचिन चिंचवडे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, २०१७ च्या निवडणुकीत याच प्रभागातून शेखर चिंचवडे यांच्या पत्नी करुणा चिंचवडे भाजपकडून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रभाग केवळ पक्षीय नव्हे, तर बदलत्या समीकरणांचा केंद्रबिंदू ठरला आहे.
मोशी-जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मण साने यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये प्रवेश करून अर्ज दाखल केला. तसेच विजयनगर-भाटनगर-पिंपरी कॅम्प प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका कोमल मेवानी यांचे पती दीपक मेवानी यांनी आणि भाजपचे धनराज आसवानी यांच्या पत्नी माजी नगरसेविका सविता आसवानी यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत अर्ज दाखल केले. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीची उमेदवारी मजबूत झाली.
पिंपळे निलख-विशालनगर-कस्पटे वस्ती प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश कस्पटे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरला. यामुळे भाजपच्या शहर पातळीवरील संघटनात्मक राजकारणात खळबळ उडाली आहे.
दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका संध्या गायकवाड आणि माजी नगरसेवक किरण मोटे यांनी ऐनवेळी शिंदेसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला.