PCMC Election 2026: आज प्रचारतोफा थंडावणार; निवडणूक प्रचाराला सायंकाळी पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:50 IST2026-01-13T15:49:02+5:302026-01-13T15:50:14+5:30
प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी केली शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी: प्रशासन आणि उमेदवारांसाठी दोन दिवस महत्त्वाचे

PCMC Election 2026: आज प्रचारतोफा थंडावणार; निवडणूक प्रचाराला सायंकाळी पूर्णविराम
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा मंगळवारी (दि. १३) थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतर उमेदवारांना घरभेटी मात्र करता येतील. शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा जोर शहरात रॅली काढून प्रचारावर राहणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता प्रचार संपणार असल्याने जाहीर सभा दुपारीच आटोपण्यावर पक्ष व उमेदवारांचा भर आहे.
निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे एकच दिवस शिल्लक आहे. या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना सजग केले आहे. काही प्रभागात हाय व्होल्टेज लढत होत असल्याने राज्यभरातील दिग्गज मंडळी तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच शिंदेसेना - भाजपचे नेतेही पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचारसभेच्या माध्यमातून आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जाणार आहेत.
पथकांची वाढली जबाबदारी
जाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवली जाणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
वाहनांची परवानगीही संपणार
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करायचा आहे. त्यामुळे, अधिकृत प्रचार मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५:३० वाजेपासून बंद होईल. त्यानंतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी असलेल्या वाहनांची परवानगी संपणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या सभा, बैठका आणि स्पिकरद्वारे होणारा प्रचार बंद राहील.
निवडणूक विभाग सज्ज
गुरुवारी होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होणारी बूथ कमिटी तयार झाली असून, त्यांचे पुन्हा प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. बुधवारी (दि. १४) या सदस्यांना मतदानाचे साहित्य वितरीत केले जाणार आहे. शहरांमध्ये एकूण ३४ भरारी पथके व ३४ एसएसटी पथके कार्यरत असून, या सर्वांची अशा घटनांवर २४ तास नजर राहणार आहे.
मकर संक्रांतीनिमित्त वाणांचे आमिष दाखवू नये
राजकीय पक्षांचे नेते उमेदवार, कार्यकर्ते सण - उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. तथापि या सण - उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. मकर संक्रांतीचा सण येत असल्याने महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष, उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी वस्तूंचे, पैशांचे वाटप करू नये. - सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख