PCMC Election 2026 :निकाल २२ फेऱ्यांत; तर गुलाल पाच तासांत; आठ केंद्रांवर होणार मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:20 IST2026-01-09T15:20:38+5:302026-01-09T15:20:55+5:30
- प्रत्येक केंद्रावर प्रभागनिहाय व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल्स असणार आहेत.

PCMC Election 2026 :निकाल २२ फेऱ्यांत; तर गुलाल पाच तासांत; आठ केंद्रांवर होणार मतमोजणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे मतदान गुरुवारी (दि.१५), तर शुक्रवारी (दि.१६) मतमोजणी होणार आहे. अवघ्या पाच तासांत २२ फेऱ्यांमध्ये संपूर्ण निकाल जाहीर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दुपारी तीनपर्यंत विजयाचा गुुलाल उधळला जाईल. कमी वेळेत, पण अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मतमोजणी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी शहरात आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रभागनिहाय व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल्स असणार आहेत. त्यामुळे मतमोजणीदरम्यान गोंधळ टाळता येणार असून, निकाल त्वरित जाहीर करता येणार आहे. प्रत्येक फेरी संपल्यानंतर संबंधित प्रभागाचा आघाडी-पराभवाचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी
मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी तसेच उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत पार पडणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळी १० वाजता सुरुवात
मतमोजणी सकाळी १० वाजता वेळेत सुरू होऊन, टप्प्याटप्प्याने २२ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. मतांची संख्या मोठी असली तरी आधुनिक यंत्रणा, संगणकीय नोंद आणि पूर्वनियोजनामुळे निकाल लवकर जाहीर होण्याचा प्रशासनाचा दावा आहे. निकालाच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती अधिकृतपणे जाहीर केली जाणार असल्याने अफवा पसरू नयेत, यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे अभिरक्षा कक्ष स्थापना केला आहे. तेथे ईव्हीएमची साठवणूक व्यवस्था, सीलबंदची यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण प्रणाली तसेच संबंधित कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व निवडणूक साहित्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यांतून पिंपरीत आणण्यात आले असून, ते अभिरक्षा कक्षामध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले आहेत. - प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता, महापालिका