PCMC Election 2026: महापालिकेच्या आखाड्यात ‘सेटलमेंट-ॲडजस्टमेंट’चे राजकारण;अनेक प्रभागांमध्ये गावकी-भावकी जपण्यास प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:21 IST2026-01-02T15:20:28+5:302026-01-02T15:21:52+5:30
- नाना काटे-शत्रुघ्न काटे यांच्या ‘ॲडजस्टमेंट’ची चर्चा

PCMC Election 2026: महापालिकेच्या आखाड्यात ‘सेटलमेंट-ॲडजस्टमेंट’चे राजकारण;अनेक प्रभागांमध्ये गावकी-भावकी जपण्यास प्राधान्य
पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात बहुरंगी लढत दिसत असली तरी, अनेक प्रभागांमध्ये गावकी-भावकी जपण्यास प्राधान्य दिले आहे. दिग्गज नेत्यांनी एकमेकांसमोर लढणे टाळले आहे. त्यांच्यातील ‘सेटलमेंट’, ‘ॲडजस्टमेंट’ आणि मैत्रीपूर्ण लढत स्पष्ट होत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर गावकी-भावकीचा प्रभाव आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभाग रचनेत एकमेकांच्या विरोधकांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळले आहे. तरीही, अनेक प्रभागांत एकाच गटातून, एकाच आडनावाचे उमेदवार समोर आले आहेत. त्यात काही ठिकाणी ‘सेटलमेंट’ दिसत आहे, तर काही जागांवर भावकीत लढत होणार आहे.
नाना काटे-शत्रुघ्न काटे यांच्या ‘ॲडजस्टमेंट’ची चर्चा
प्रभाग २८ मधून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने प्रत्येकी चार उमेदवार उतरवले आहेत. या प्रभागात ‘काटे’च निवडून येत असल्याचा पूर्वेतिहास आहे. २०१७ मध्ये तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपचे सध्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दिग्गज नेते नाना काटे यांच्याशी समोरासमोर लढण्याचा आग्रह धरला होता. मात्र, ते लढले नाहीत. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी इतर मागासवर्ग संवर्गातून ‘अ’ जागेवर, तर नाना काटे यांनी सर्वसाधारण गटातून ‘ड’ जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यावेळीही दोघे समोरासमोर आलेले नाहीत. या ‘ॲडजस्टमेंट’ची चर्चा आहे.
भावकी-नात्यागोत्यांच्या लढती
प्रभाग क्रमांक ६ धावडेवस्तीमध्ये दोन जागांवर लांडगे विरुद्ध लांडे, प्रभाग ७ भोसरी गावठाणामध्ये लोंढे विरुद्ध लांडे, गव्हाणे विरुद्ध फुगे विरुद्ध लांडगे, असा सामना होत आहे. प्रभाग १२ मध्ये भालेकर विरुद्ध भालेकर, प्रभाग १६ किवळे मामुर्डीमध्ये भोंडवेविरुद्ध भोंडवे, अशी दोन गटांत लढत होणार आहे. प्रभाग १७ मध्ये चिंचवडे विरुद्ध चिंचवडे, वाल्हेकर विरुद्ध वाल्हेकर संघर्ष आहे. प्रभाग १८ मधील एका जागेवर चिंचवडे विरुद्ध चिंचवडे सामना होत आहे. प्रभाग २० वल्लभनगर कासारवाडीमध्ये लांडे विरुद्ध लांडे, तर प्रभाग २१ मध्ये दोन वाघेरे दोन गटांतून लढत आहेत. प्रभाग २२ मधून एका जागेवर काळे विरुद्ध काळे, प्रभाग २३ मध्ये दोन जागांवर बारणे विरुद्ध बारणे, प्रभाग २८ मध्ये तीन गटांमध्ये काटे विरुद्ध काटे, प्रभाग ३० दापोडीमध्ये एका जागेवर काटेविरुद्ध काटे, प्रभाग ३१ मध्ये एका गटामध्ये जगताप विरुद्ध जगताप समोरासमोर आहेत. या प्रभागातून तीन गटांमध्ये जगताप भावकीतील उमेदवार आहेत, पण ते समोरासमोर आलेले नाहीत. प्रभाग ३२ सांगवी गावठाणमधून ढोरे विरुद्ध ढोरे, शितोळे विरुद्ध शितोळे लढत आहेत.