PCMC Election 2026: कार्यकर्तेच गायब..! महापालिका प्रचारात उमेदवारांची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:28 IST2026-01-06T13:28:13+5:302026-01-06T13:28:41+5:30
अपक्षांची अधिक अडचण; काही प्रभागांत कार्यकर्त्यांची ‘पळवापळवी’

PCMC Election 2026: कार्यकर्तेच गायब..! महापालिका प्रचारात उमेदवारांची दमछाक
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असला, तरी प्रत्यक्ष मैदानात उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रचारासाठी आवश्यक असलेली कार्यकर्त्यांची फौजच गायब झाल्याने अनेक उमेदवार हतबल झाले आहेत. पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांची अवस्था अधिक बिकट असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रचाराची कसरत अधिकच वाढली आहे. प्रभागांचा विस्तार मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी टीम आवश्यक असते. मात्र, सध्या बहुतांश प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. झेंडे, पत्रके, मतदारांशी थेट संपर्क, बैठका, सभा आणि सोशल मीडिया प्रचारासाठी मनुष्यबळ हवे असताना प्रत्यक्षात उमेदवारांना ‘एकट्यानेच लढा’ द्यावा लागत आहे.
निराश कार्यकर्ते प्रचारापासून दूर...
विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. उमेदवारी डावलल्यामुळे अनेक इच्छुक आणि त्यांचे समर्थक प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. परिणामी, पक्षीय उमेदवारांनाही अपेक्षित कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत नसल्याचे वास्तव आहे.
कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू...
काही प्रभागांत तर कार्यकर्त्यांची चक्क ‘पळवापळवी’ सुरू असल्याचे चित्र आहे. एकाच वेळी दोन-तीन उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना विविध ‘ऑफर’ दिल्या जात असल्याने कार्यकर्ते कुणाच्या प्रचारात सहभागी व्हायचे, यावरच संभ्रमात आहेत. यामुळे प्रचाराचे नियोजन कोलमडत असून, उमेदवारांची धावपळ वाढली आहे. पूर्वी पक्षनिष्ठ कार्यकर्ते निवडणुकीत उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरायचे. मात्र, सध्या वैयक्तिक अडचणी, वाढता निवडणूक खर्च आणि वेळेअभावी अनेकजण प्रचारापासून दूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट फटका प्रचार यंत्रणेला बसत असून, उमेदवारांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत.