Municipal Election : महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:43 IST2025-12-25T10:41:35+5:302025-12-25T10:43:17+5:30
व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या याद्यांनी इच्छुकांची धावपळ वाढली; भाजप, शिंदेसेना आणि रिपाइंच्या जागांचे वाटप अंतिम टप्प्यात, पण बंडखोरीच्या भीतीने घोषणेस खीळ

Municipal Election : महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप, प्रभागरचना, आरक्षण आणि संभाव्य उमेदवारांबाबत रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत तोडगा न निघाल्याने व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या उमेदवारांच्या याद्यांनी इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाचे गणित अद्याप अंतिम टप्प्यावर पोहोचलेले नाही. काही प्रभागांमध्ये ‘एकला चलो रे’चा पर्याय चर्चेत असतानाच, मित्रपक्षांकडून अधिक जागांची मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि इच्छुक संभ्रमात सापडले आहेत. राष्ट्रवादीकडून (अजित पवार) शिंदेसेना किंवा महाविकास आघाडीसोबत येते का, याबाबतही चाचपणी सुरू आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उध्दवसेना यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा आणि कोणत्या प्रभागात उमेदवारी मिळणार, यावर अजूनही स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर अंतिम यादीच्या नावाखाली उमेदवारांच्या नावांच्या याद्या फिरत आहेत. या याद्यांमुळे काही इच्छुक प्रचाराची तयारी करत आहेत, तर काहीजण पक्षनेत्यांच्या भेटीगाठी वाढवत दबावतंत्राचा वापर करत आहेत. काही प्रभागांमध्ये तर एकाच जागेसाठी दोन-तीन नावे व्हायरल होत असल्याने स्थानिक स्तरावर अस्वस्थता आहे.
अधिकृत यादीच ग्राह्य धरा!
दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणतीही यादी ग्राह्य धरू नये, असे स्पष्ट करण्यात येत असले तरी, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जवळ आल्याने उमेदवारांची धावपळ वाढत आहे. जागावाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
बंडखोरीचे संकेत
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढत आहे. वरिष्ठ नेतृत्त्वाच्या निर्णयात विलंब होत असताना स्थानिक पातळीवर संभाव्य बंडखोरीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. महायुतीत काही प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना यांचे एकाच जागेवर एकाहून अधिक इच्छुक सक्रिय झाले आहेत. अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी किंवा शेवटच्या टप्प्यात पक्ष बदलण्याचे पर्याय खुले ठेवल्याची चर्चा आहे.
महायुतीची अंतिम यादी तयार?
महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि रिपाइंच्या जागांचे वाटप अंतिम झाले आहे. मात्र, महायुतीतील पक्षांना मिळालेल्या जागा जाहीर झाल्यानंतर बंडखोरी उफाळणार आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी यादी जाहीर करण्यात येत नसल्याचे महायुतीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.