Municipal Election : एकहाती सत्ता ते एकही नगरसेवक नाही...
By नारायण बडगुजर | Updated: December 30, 2025 13:20 IST2025-12-30T13:19:33+5:302025-12-30T13:20:35+5:30
वरिष्ठ नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्याने काँग्रेसची वाताहत : कार्यकर्त्यांनाही सोडावा लागतोय पक्षाचा ‘हात’

Municipal Election : एकहाती सत्ता ते एकही नगरसेवक नाही...
पिंपरी : एकेकाळी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असलेल्या काँग्रेस पक्षाची पिंपरी-चिंचवड शहरात वाताहत झाली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता ते एकही नगरसेवक नाही, असे चित्र महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत होते. यंदाही या पक्षात काहीही आलबेल नसल्याने पक्षातील कार्यकर्ते इतर पक्षाच्या वाटेवर आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १९८६ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष सुरेश सोनवणे, तत्कालीन माजी शहराध्यक्ष टी. एन. तिरुमणी, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, विजयसिंह मोहिते, रामकृष्ण मोरे, सोपानराव भोर. शंकरराव बाजीराव पाटील, अशोकराव तापकीर, अशोकराव मोहोळ, जगन्नाथ देवरे, नाना नवले, प्रतापराव भोसले, सोपानराव भोर, जगन्नाथ देवरे, प्रभा राव, फकिर पानसरे अशा काही व्यक्तींचा उमेदवार निवड समितीमध्ये समावेश होता. मात्र, महापालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचे सांगत बंडखोरी होऊन इंदिरा काँग्रेस हा अपक्ष गट सोपानराव भोर यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उतरला. त्यावेळी निवडणुकीनंतर काँग्रेसकडून ज्ञानेश्वर लांडगे शहराचे पहिले महापौर झाले.
दरम्यान, रामकृष्ण मोरे यांनी शहर काँग्रेसवर मोठे वर्चस्व मिळवले. त्यांच्या माध्यमातून नव्वदच्या दशकात शहरातील पक्षसंघटनेमध्ये उत्तम स्थिती होती. मात्र, त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील राजकारणावर पकड घट्ट करत असताना काँग्रेसकडून पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद आणि इतर महत्त्वाची पदे देखील काँग्रेसने सत्ताकाळात रिक्त ठेवली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संधी दिली नाही.
काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बळ न मिळाल्याने शहरात पक्षसंघटना कमकुवत होत गेली. त्यामुळे काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादीमध्ये गेले. श्रीरंग बारणे शिवसेनेत गेले. सचिन साठे भाजपमध्ये गेले. दरम्यान, कैलास कदम यांनी शहराध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम यांनी निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच, पक्षाची निवडणूक समन्वय समिती नियुक्त करण्यावरून वादही झाले. त्यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी इतर पक्षांच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत आघाडीच्या घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे काँग्रेससोबत जाण्यास इतर पक्ष उत्सुक नसल्याचे दिसून येते.
पक्षाचा स्थापना दिन अन् वाताहत...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा २८ डिसेंबरला १४०वा स्थापना दिन होता. पक्षाकडून हा दिवस साजरा होत असताना शहरात पक्षसंघटना अतिशय कमकुवत झाल्याचे दिसून येते. १९८६ मध्ये निष्ठावंतांना डावलले म्हणून इच्छुक उमेदवारांना पक्षातून बंडखोरी करत स्वतंत्र गट तयार करावा लागला होता. मात्र, महापालिकेच्या २०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२८ जागांसाठी इच्छुक उमेदवारही नाहीत. त्यामुळे आता ‘उमेदवारी घेता का उमेदवारी?’ असे म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १९८६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती सत्ता ते २०१७ च्या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून न येणे आणि २०२६च्या निवडणुकीत उमेदवार न मिळण्यापर्यंत काँग्रेसची वाताहत झाली आहे.
हातमिळवणी करून सोडला ‘हात’
महापालिकेच्या १९८६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ६० पैकी काँग्रेसचे ४२ आणि पक्षातून बंडखोरी केलेले १० अपक्ष एकत्र येऊन ५२ नगरसेवकांच्या माध्यमातून एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर १९९२च्या निवडणुकीतील ७८ पैकी काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले. १९९७ मध्येही काँग्रेसने विजयी घोडदौड कायम ठेवली. यानंतर राष्ट्रवादीने निवडणुकांसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यावेळी २००२ मध्ये १०५ पैकी काँग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आले. २००७ मध्ये १०५ पैकी २१ तर २०१२ मध्ये १२८ पैकी १४ उमेदवार निवडून आले. यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसचा ‘हात’ सोडला आणि २०१२ मध्ये राष्ट्रवादीने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. यानंतर शहरातील राजकारणात भाजपचे वर्चस्व निर्माण झाले. २०१७ मधील निवडणुकीत चार सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये ३२ प्रभागांमधून एकूण १२८ जागांवर काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.