PCMC Election 2026:पिंपरी-चिंचवडमध्ये नवा ‘केजीएफ’..शहरात दोन ‘गरुडा’; रोहित पवारांची भाजप आमदारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:32 IST2026-01-09T12:31:24+5:302026-01-09T12:32:16+5:30
- एक दाढीवाला आणि एक बिनदाढीवाला! त्यांनी या शहराला लुटून मलिदा खाल्ला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आमदारांवर केला.

PCMC Election 2026:पिंपरी-चिंचवडमध्ये नवा ‘केजीएफ’..शहरात दोन ‘गरुडा’; रोहित पवारांची भाजप आमदारांवर टीका
पिंपरी : काही दिवसांपूर्वी ‘केजीएफ’ हा चित्रपट आला होता. त्यामध्ये एक ‘गरुडा’ होता. त्याच्या खाणीत फक्त त्याचीच माणसे कामे करायची. या शहरात दोन ‘गरूडा’ आहेत. एक दाढीवाला आणि एक बिनदाढीवाला! त्यांनी या शहराला लुटून मलिदा खाल्ला, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आमदारांवर केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीने सांगवी येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी आमदार पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रानुसार शहराचे तुकडे झाले असून, या आमदारांनी शहराला लुटले. महापालिकेत फक्त आमदारांच्या जवळच्यांनाच ठेके मिळतात. तेथे नोकऱ्या मिळत नाहीत. तुमच्या-आमच्या मुलांना नोकऱ्या मिळण्याचा अधिकार नाही का? तुमच्या मुलांना ठेके मिळू शकत नाहीत. कारण त्यांना फक्त त्यांची घरे भरायची आहेत. आज शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, कारण यांना टँकरलॉबी पोसायची आहे. काही दिवसांपूर्वी एका सोसायटीमधील नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली, तर ते घरी येईपर्यंत त्यांच्या घरी गुंड पोहोचले. ही दहशत मोडून काढावी लागेल.
पवार म्हणाले की, २०१७ मध्ये भाजपने जाहीरनाम्यात २२ मुद्दे दिले होते. त्यानुसार, तुमचा तीन लाखांपर्यंत आरोग्यविमा काढला का? इस्त्रायलच्या धर्तीवर शाळा झाली का? अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवला का? २२ मुद्द्यांपैकी एकही मुद्दा त्यांना सोडवता आला नाही.