PCMC Election 2026: 'त्या' निवडणुकीत शिलेदारामुळेच ढासळला राष्ट्रवादीचा गड, पिंपरीवर भाजपचा झेंडा
By विश्वास मोरे | Updated: January 8, 2026 10:53 IST2026-01-08T10:52:47+5:302026-01-08T10:53:41+5:30
२०११ च्या जनगणनेनुसार या निवडणुकीमध्ये १७ लाख ५० हजार लोकसंख्या होती, तर एकूण वॉर्ड १२८ होते. चार सदस्य प्रभाग पद्धतीने ३२ प्रभागात निवडणूक झाली.

PCMC Election 2026: 'त्या' निवडणुकीत शिलेदारामुळेच ढासळला राष्ट्रवादीचा गड, पिंपरीवर भाजपचा झेंडा
पिंपरी : महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. २००७ पासून शहरावर पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिली. मात्र, सन २०१४ पासून आलेल्या मोदीलाटेत २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा गड कोसळला आणि अजित पवार यांचेच मोहरे हेरून पिंपरी- चिंचवड शहरावर भाजपचा झेंडा फडकविला. आणि एकेकाळची काँग्रेस शून्य झाली.
२०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा गड लक्ष करण्यास सुरुवात केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे हे मोहरे फोडले. सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती दिली. येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली, पद दिली. तसेच प्रलंबित असणारे शास्ती कर, अनधिकृत बांधकामे त्याचबरोबर शहराची 'सार्वजनिक सुरक्षा सुरक्षितता, भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार' असे अभिवचन दिले होते.
२०११ च्या जनगणनेनुसार या निवडणुकीमध्ये १७ लाख ५० हजार लोकसंख्या होती, तर एकूण वॉर्ड १२८ होते. चार सदस्य प्रभाग पद्धतीने ३२ प्रभागात निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत झाली आणि महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. सर्वाधिक ७७ जागा भाजपला मिळाल्या आणि पंधरा वर्षे प्रथम क्रमांकावर असणारी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.
या निवडणुकीत कोण आले होते?
निवडणुकीच्या आखाड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, नेते चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांनी लक्ष केंद्रित केले. तसेच काँग्रेसच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी सभा घेतल्या. त्याचबरोबर मनसेच्या वतीने राज ठाकरे, शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे, संजय राऊत अशा नेत्यांच्या सभा झाल्या. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही सभा घेतली होती.
या निवडणुकीत काय होते प्रश्न?
या निवडणुकीमध्ये अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शास्तीकर माफी, त्याचबरोबर पिण्याचे अपुरे पाणी, आरोग्य, नद्यांचे प्रदूषण असे प्रमुख प्रश्न होते.
नवीन चेहरे दाखल
पहिल्यांदाच सभागृहामध्ये ६० टक्के नवीन चेहरे आले. त्यामध्ये शैलजा मोरे, हिराबाई घुले, प्रियंका बारसे, राहुल कलाटे, संदीप वाघेरे, बापू काटे, अमित गावडे, नामदेव ढाके, तुषार कामठे, सारिका सस्ते, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, सुवर्णा बुर्डे, विकास डोळस, रवी लांडगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, विक्रांत लांडे, अनुराधा गोफणे, तुषार हिंगे, मीनल यादव, राजेंद्र गावडे, सुलक्षणा धर-शीलवंत, मयूर कलाटे, संदीप कस्पटे यासह अनेकजण नवीन चेहरे आले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक मात्तबर पराभूत झाले, तर रवी लांडगे हे बिनविरोध झाले.
माजी नगरसेवकही पुन्हा सभागृहात
या सभागृहामध्ये दत्ता साने, मंगला कदम, योगेश बहल, माई ढोरे, सुमन पवळे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, एकनाथ पवार, अपर्णा डोके, राहुल जाधव, नितीन काळजे, अजित गव्हाणे, संतोष लोंढे, नितीन लांडगे, सीमा सावळे, विलास मेडिगेरी, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, जयश्री गावडे, शाम लांडे, उषा वाघिरे, डब्बू आसवाणी, विनोद नढे, संतोष कोकणे, झामाबाई बारणे, माया बारणे, चंद्रकांत नखाते, नाना काटे, आशा सूर्यवंशी, नवनाथ जगताप असे अनेक नगरसेवक पुन्हा निवडून आले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले, तर भोसरी मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले महेश लांडगे यांनी भाजप संलग्न आमदार म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी २०१७ मध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले.
असे होते बलाबल !
२०१७ एकूण जागा - १२८
भाजप - ७७
राष्ट्रवादी काँग्रेस - ३६
शिवसेना - ९
मनसे - १
अपक्ष - ५