PCMC Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ‘तू-तू मैं-मैं’; मागची पाने पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 6, 2026 18:40 IST2026-01-06T18:38:51+5:302026-01-06T18:40:20+5:30
अजित पवारांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही; पण त्यांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागायला हवे होते.

PCMC Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ‘तू-तू मैं-मैं’; मागची पाने पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये ते अनेक वर्षे सत्तेत होते. मागची पाने पलटायची आमची इच्छा नाही; पण तसे झाले तर बोलण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही मागची पाने चाळली तर अजित पवारांना बोलता येणार नाही, असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. सत्तर हजार कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून, त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूलमंत्री बावनकुळे मंगळवारी (दि. ६) आले होते. शहरात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
निकाल आल्यावर पुढची भूमिका ठरेल...
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत, ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सगळ्यांना माहिती आहे; पण ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो आहे,’ असा युक्तिवाद केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काही अभिमानास्पद नाही. प्रकरण न्यायालयात आहे, निकाल आल्यावर पुढची भूमिका ठरेल. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या महापालिका निवडणुकीसाठी अशा बाबी बाहेर काढून महायुतीत मनभेद निर्माण करणे योग्य नाही. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही
बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मनभेद निर्माण होईल, असे वक्तव्य टाळण्याचा निर्णय झाला आहे. अजित पवारांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही; पण त्यांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागायला हवे होते.