PCMC Election 2026: भाजप ११० जागांवर लढणार, शिंदेसेनेला १३, रिपाइंला पाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:03 IST2025-12-30T14:02:37+5:302025-12-30T14:03:23+5:30
Pimpri Chinchwad Municipal Election 2026: युतीची चर्चा फिस्कटण्याच्या मार्गावर; जागावाटप, उमेदवारी आणि नेतृत्वाच्या निर्णयांवर एकमत नाहीच; दोन्ही पक्षांचे नियोजन अपयशी; पक्षांतर्गत असंतोष वाढला; बंडखोरीची भीती

PCMC Election 2026: भाजप ११० जागांवर लढणार, शिंदेसेनेला १३, रिपाइंला पाच
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार) अखेरचा दिवस असताना, महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांचा गोंधळ कायम आहे. जागावाटप, उमेदवारी आणि नेतृत्वाच्या निर्णयांवर एकमत न झाल्याने युती प्रत्यक्षात कागदावरच आहे. निवडणूक तोंडावर असताना दोन्ही पक्षांचे नियोजन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.
भाजपकडून अद्याप उमेदवार यादी जाहीर न झाल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढला आहे. इच्छुकांची संख्या मोठी, बंडखोरी आणि नाराजांची जबाबदारी कोण घेणार, या भीतीपोटी नेतृत्वाने निर्णय लांबवले. मात्र, या विलंबाचा फटका युतीला बसत असून, सत्ता आहे पण दिशा नाही, अशी परिस्थिती भाजपमध्ये आहे.
दुसरीकडे, शिंदेसेनेची अवस्था अधिकच अडचणीची झाली आहे. भाजपवर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने शिंदेसेनेने स्वतंत्रपणे उमेदवारांची तयारीच केलेली नाही. ऐनवेळी युती तुटल्यास शिंदेसेनेकडे लढण्यास सक्षम उमेदवार नसल्याची स्थिती आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्यास अर्ज बाद होण्याचा धोका अधिक असल्याने शिंदेसेनेची कोंडी झाली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदेसेनेला भाजपसोबत नेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. युती आहे की नाही, हेच ठरलेले नसताना प्रचार कसा करायचा, असा सवाल दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांते करत आहेत. एकीकडे भाजप संघटन मजबूत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शिंदेसेनेकडे तळागाळात संघटन दिसत नसल्याचे चित्र आहे.
शिंदेसेनेची राष्ट्रवादीसोबतही चर्चा
शिंदेसेनेची राष्ट्रवादी (अजित पवार) सोबतही चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा करुन शिंदेसेनेची तसेच महाविकास आघाडीचीही कोंडी केली आहे.
महायुुती होणारच आहे. शिंदेसेनेला अपेक्षित जागा सोडण्यात आल्या आहेत. आज ए आणि बी फॉर्म देण्यात येतील. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युती नाही झाली तर शहरातील सर्वच १२८ जागांवर आमचे उमेदवार तयार आहेत. - राजेश वाबळे, महानगरप्रमुख, शिंदेसेना