PCMC Election 2026:स्मशानभूमीतही उमेदवार म्हणतात ‘लक्ष असू द्या..!’निवडणूक प्रचाराला ना वेळेची, ना जागेची मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:41 IST2026-01-02T14:40:18+5:302026-01-02T14:41:52+5:30
- मतांसाठी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही हजेरी

PCMC Election 2026:स्मशानभूमीतही उमेदवार म्हणतात ‘लक्ष असू द्या..!’निवडणूक प्रचाराला ना वेळेची, ना जागेची मर्यादा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीस अवघे पंधरा दिवस उरले असून, शहरातील प्रचाराने सर्व सामाजिक, भावनिक मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रचार सभा, रॅली, पदयात्रांपुरते मर्यादित न राहता उमेदवारांनी आता मतदारांच्या सुख-दु:खाच्या क्षणात प्रचाराची संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. अगदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या मतदारांना ‘लक्ष असू द्या..!’ म्हणत उमेदवार विनवत असल्याच्या घटना चर्चेचा विषय ठरत आहेत.
महापालिका निवडणूक प्रचार अधिकाधिक वैयक्तिक होतानाही दिसत आहे. मात्र त्याला कोणतीही वेळ, जागा किंवा संवेदनशीलतेची सीमा उरलेली नाही. लग्नसोहळे, डोहाळे जेवण, वाढदिवस, गृहप्रवेश अशा खासगी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये उमेदवारांची उपस्थिती आता सामान्य झाली आहे. शुभेच्छांच्या आडून मतांची गणिते मांडली जात असून, कार्यक्रम कुठलाही असो, प्रचार मात्र हवाच, हेच सूत्र उमेदवारांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या मतदारांना ‘लक्ष असू द्या..!’ म्हणत उमेदवार विनवत आहेत.
शाळांच्या गेटवरही प्रचार
शहरातील शाळा परिसरही प्रचारापासून सुटलेले नाहीत. शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत उमेदवार गेटवर उभे राहून पालकांशी संवाद साधत आहेत. शिक्षण, सुरक्षितता, पायाभूत सुविधांवर आश्वासनांची बरसात सुरू आहे.
अति-प्रचारावर बोचऱ्या प्रतिक्रिया
या अति-प्रचारावर मतदार बोचऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता प्रचारासाठी प्रसूतिगृह आणि स्मशान हेही सोडू नका, अशी उपरोधिक टिप्पणी ज्येष्ठ नागरिकाने केली.