Municipal Election : तंत्रज्ञानाचा नवा अजेंडा; पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘एआय’चा प्रभावी वापर ठरणार गेमचेंजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:16 IST2025-12-30T13:15:29+5:302025-12-30T13:16:18+5:30
- प्रचाराचे बदलले स्वरूप; यंदा आधुनिक वळण

Municipal Election : तंत्रज्ञानाचा नवा अजेंडा; पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘एआय’चा प्रभावी वापर ठरणार गेमचेंजर
- आकाश झगडे
पिंपरी : निवडणुकीच्या रणांगणात यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) नावाची अदृश्य ताकद उतरत आहे. उमेदवार ‘एआय’चा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखत आहेत. यंदाची निवडणूक केवळ पारंपरिक सभा आणि पदयात्रांवर आधारित न राहता, एआय आणि डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून लढली जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या शहराच्या राजकारणात ‘एआय’चा वापर सुरू झाला आहे.
एआयचा वापर प्रचार, मजकूर निर्मिती आणि मतदार-विश्लेषण यासाठी केला जात आहे. एखाद्या प्रभागातील किंवा अगदी सोसायटीमधील मतदारांच्या गरजा ओळखून त्यानुसार संदेश तयार करणे, मागील निवडणुकांचे मतदान पॅटर्न, सोशल मीडियावरील ट्रेंड आणि महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीतील माहिती एकत्र करून एआय त्यांच्या समस्या ओळखेल. उमेदवाराला त्या प्रभागातील लोकांच्या समस्यांवर आधारित व्यक्तिगत प्रचाराचा मजकूर, व्हॉट्सॲप मेसेज किंवा व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करून देईल. यामुळे मतदारांना वाटेल की उमेदवार केवळ त्यांच्याच समस्यांवर बोलत आहे.
‘डार्क कॅम्पेनिंग’ आणि विरोधी पक्षाचे विश्लेषण
प्रतिस्पर्ध्याच्या कमतरता ओळखणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मागील भाषणांचे, सोशल मीडिया पोस्टचे आणि त्यांनी महापालिकेत मांडलेल्या भूमिकेचे विश्लेषण केले जाईल. एआय त्या उमेदवाराच्या वक्तव्यांमधील विसंगती ओळखून त्यावर आधारित 'टार्गेटेड कॅम्पेन' किंवा 'डार्क पोस्ट' (जाहिराती) तयार करू शकते. कमी वेळेत आणि खर्चात मोठ्या प्रमाणावर प्रचार सामग्री तयार करणे, उमेदवाराचा आवाज क्लोन करून, वेगवेगळ्या भाषेत व्हॉइस मेसेज तयार केले जातील. उमेदवाराच्या भाषणाचे किंवा जाहीरनाम्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर आणि सारांश तयार करता येईल. उमेदवाराच्या वेबसाइटवर किंवा व्हॉट्सॲपवर चॅटबॉट्स लावले जातील. हे बॉट्स नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांवर, उदा. पाण्याची योजना कधी सुरू होणार?, उमेदवाराच्या जाहीरनाम्यातून त्वरित अचूक उत्तरे देतील.
एआयच्या वापरामुळे निर्माण होणारी आव्हाने
एआयच्या मदतीने तयार केलेले डीपफेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स गोंधळ निर्माण करू शकतात. प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्यासाठी याचा गैरवापर होऊ शकतो. मतदारांना केवळ त्यांच्या आवडीच्या आणि विचारधारेच्याच पोस्ट दिसू शकतात. त्यामुळे लोकांचे राजकीय ध्रुवीकरण होऊ शकते. प्रचार आणि आश्वासनांमध्ये पारदर्शकता कमी होऊ शकते.
पिंपरी-चिंचवडसाठी ‘एआय’चे महत्त्व
पिंपरी-चिंचवड शहर आयटी क्षेत्राशी जोडलेले असल्याने येथील मतदार डिजिटल साक्षर आहे. एआयमुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत अचूक संदेश पोहोचवता येत आहे. डिजिटल संपर्क अधिक महत्त्वाचा ठरेल. निवडणूक आयोग, राजकीय पक्षांना प्रचाराचे नियम पाळण्याचे आव्हान असेल.