Municipal Election 2026: शह-काटशहाचे राजकारण..! 'त्या' निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व, पण महापौर अजित पवारांचा;नेमकं काय घडलं ?
By विश्वास मोरे | Updated: December 31, 2025 14:04 IST2025-12-31T13:59:43+5:302025-12-31T14:04:38+5:30
- महापालिकेची दुसरी निवडणूक १९९२ मध्ये झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साडेआठ लाख होती.

Municipal Election 2026: शह-काटशहाचे राजकारण..! 'त्या' निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व, पण महापौर अजित पवारांचा;नेमकं काय घडलं ?
पिंपरी : महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यावेळी पक्षात प्रा. रामकृष्ण मोरे आणि अजित पवार असे दोन गट सक्रिय होते. मोरे यांचे वर्चस्व असले तरी पवार यांनी खेळी खेळून अपक्ष विलास लांडे यांना महापौर केले. येथूनच प्रा. मोरे यांना पवारांनी शह देण्यास सुरुवात केली.
महापालिकेची दुसरी निवडणूक १९९२ मध्ये झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साडेआठ लाख होती. तेव्हा ७८ प्रभाग होते. दरम्यान, १९९१ मध्ये खासदार झाल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजप, जनता दल, अपक्ष अशी लढत झाली. काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले. अपक्षांत विलास लांडे यांचा समावेश होता. काँग्रेस विजयी झाली. रंगनाथ फुगे, मधुकर पवळे, नाना शितोळे, तात्या कदम, अशोक कदम, संजोग वाघेरे, आझम पानसरे, हनुमंत भोसले, श्याम वाल्हेकर, लक्ष्मण जगताप, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर, प्रल्हाद सुधारे निवडून आले होते. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
शह-काटशहाचे राजकारण
महापौरपदाच्या निवडीत अजित पवार यांनी लक्ष घातले. त्यावेळी प्रा. मोरे आणि पवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महापौरपदासाठी काँग्रेसने मधुकर पवळे यांना उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारीत अन्याय झाल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनी विलास लांडे यांचे नाव पुढे केले. अनेकांनी लांडे यांच्या नावास विरोध केला. मात्र, शरद पवार यांनी नाराजांची बैठक घेतली. समजूत काढली. त्यामुळे तीन मतांनी विलास लांडे महापौरपदी निवडून आले.
काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर ही पहिली निवडणूक होती. अजित पवार यांनी लक्ष घातले होते. मात्र, महापौरपदावर विलास लांडे विजयी झाले. शहरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासह प्राधिकरण परिसरातील साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यावर निवडणूक लढली गेली. माझीही उमेदवारी कापली जाणार होती. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर मी वेळीच सावध झालो होतो. - श्यामराव वाल्हेकर, माजी विरोधी पक्षनेते
मला उमेदवारी नाकारली होती. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झालो. महापौरपदासाठीही मला विरोध झाला. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी मला संधी दिली. - विलास लांडे, माजी महापौर