PCMC Election 2026 : उमेदवार याद्यांचा गोंधळात गोंधळ..! दोन्ही राष्ट्रवादीची धावपळ तर भाजप अन् शिंदेसेनेचीही दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:15 IST2026-01-01T13:15:13+5:302026-01-01T13:15:35+5:30
- युती-आघाड्यांचे लांबलेले निर्णय, एबी फॉर्म वाटपातील घोळ, उमेदवारांची अदलाबदली आणि अंतर्गत मतभेदाचा परिणाम

PCMC Election 2026 : उमेदवार याद्यांचा गोंधळात गोंधळ..! दोन्ही राष्ट्रवादीची धावपळ तर भाजप अन् शिंदेसेनेचीही दमछाक
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून ३० तास उलटून गेले, तरी बुधवारी सायंकाळपर्यंत प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवार याद्या जाहीर झाल्या नव्हत्या. युती-आघाड्यांचे लांबलेले निर्णय, एबी फॉर्म वाटपातील घोळ, उमेदवारांची अदलाबदली आणि अंतर्गत मतभेद यामुळे राजकीय पक्षांचा गोंधळ सुरू होता.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत युती-आघाड्यांच्या गोंधळामुळे राजकीय चित्र गुंतागुंतीचे झाले आहे. विशेष म्हणजे, कोणत्या उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ देण्यात आला, याची स्पष्ट माहिती पक्षाच्या शहराध्यक्षांनाच नसल्याचे दिसून आले. एकाच प्रभागात दोन-दोनजण आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करीत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही गोंधळ उडाला आहे.
राष्ट्रवादी एकत्रित; प्रत्यक्षात दुभंगलेलीच
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष मैदानात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) ११० आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १८ जागांवर लढणार असल्याचे ठरले होते. मात्र, काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला उमेदवारच मिळाले नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवारांना दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म दिले गेल्याने कोणता अर्ज अंतिम राहणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याच गोंधळातून काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती निश्चित झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये चारही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. प्रभाग २० मध्ये चार जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार असतील, तर दोन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचेही उमेदवार असतील. प्रभाग १८ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष चार जागा लढविणार आहे. मात्र, तेथे एका जागेवर शरद पवार गटाचाही उमेदवार असेल.
उशिराच्या निर्णयामुळे भाजप-शिंदेसेनेची तारांबळ
भाजपने युतीचा निर्णय शेवटपर्यंत ताणून धरल्याचा फटका उमेदवार निवडीत बसला आहे. भाजपने सुरुवातीला १२३ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, छाननीअंती तीन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. शिंदेसेनेचेही दोन एबी फॉर्म बाद झाले. हा पक्ष ६९ जागांवर थेट निवडणूक लढवत असून, चार जागांवर उमेदवारांना पुरस्कृत करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या चिंधड्या
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत गेला आहे, तर उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची बोलणी ऐनवेळी फिस्कटल्याने दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे उतरावे लागले आहे. उद्धवसेनेसोबत ‘मनसे’ आणि ‘रासप’ असून, उद्धवसेना ५९, तर मनसे १७, रासप २ जागा लढवीत आहे. काँग्रेस ५८ जागांवर स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पूर्णपणे फुटली आहे. उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचे नियोजन करताना सर्व पक्षांची धावपळ सुरू होती.
अधिकृत यादी रखडली; चर्चांना उधाण
या सर्व घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली अधिकृत उमेदवार यादी दोन दिवस प्रसिद्ध होऊ शकली नाही. कोणत्या प्रभागात नेमका कोण रिंगणात आहे, याबाबत कार्यकर्ते, मतदार आणि उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.
मतांची विभागणी होणार ?
मैत्रीपूर्ण लढती, उमेदवारांचा अभाव, एबी फॉर्म बाद होणे आणि उशिरा झालेले निर्णय यामुळे अनेक प्रभागांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींमुळे थेट मतविभागणी होणार असून, कोणाला फायदा होतो आणि कोणाला फटका बसतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
काम सुरू आहे, यादी येईल...
‘काम सुरू असून, थोड्याच वेळात यादी जाहीर केली जाईल’, असे सांगत सर्वच पक्षांचे शहराध्यक्ष आणि प्रमुख नेते प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळत होते. अधिकृत उमेदवार यादी रखडल्याबाबत नेत्यांनी मौन बाळगणे पसंत केले. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता.