PCMC Elections 2026: भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आराेप-प्रत्याराेप म्हणजे ‘नुरा कुस्ती’; सुषमा अंधारे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:44 IST2026-01-09T12:43:59+5:302026-01-09T12:44:23+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका कुबेराची खाण आहे, त्यामुळे सत्तेतीमधील दाेन पक्ष भांडत आहे.

PCMC Elections 2026: भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आराेप-प्रत्याराेप म्हणजे ‘नुरा कुस्ती’; सुषमा अंधारे यांची टीका
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आराेप-प्रत्याराेप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपचे आमदार भ्रष्टाचाराचे ‘आका’ म्हणतात, मात्र या ‘आकां’ना भाजपच्याच नेत्यांनी मांडीवर घेतले आहे, अशी टीका उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (दि.८) पत्रकार परिषदेत केली. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, निवडणूक प्रभारी अशाेक वाळके, उपजिल्हा प्रमुख राेमी संधू, कैलास नेवासकर उपस्थित हाेते.
अंधारे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड महापालिका कुबेराची खाण आहे, त्यामुळे सत्तेतीमधील दाेन पक्ष भांडत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्जबाजारी झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावली आहे. समाविष्ट पुनावळे, ताथवडे भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. असे असताना शहरातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीचे नेते आराेप-प्रत्याराेप करून नुरा कुस्ती खेळत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देऊन निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले.
निवडणूक आयाेगाचा खाेडसाळपणा
अंधारे म्हणाले की, निवडणूक आयाेगाचा खाेडसाळपणा समाेर आला आहे. शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह ईव्हीएमवर ओळखता येत नाही. याबाबत आम्ही निवडणूक विभागाला लेखी पत्र देऊन आक्षेप नाेंदविला आहे.
फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास
अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राजकीय संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाला. भ्रष्टाचारावर टीका करून, इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेऊन त्यांच्याच मांडीला माडी लावून बसायचे, हा त्यांचा ढाेंगीपणा आहे. भाजपही गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष झाला असून, दहशतीच्या जाेरावर बिनविराेध नगरसेवक निवडून आणले जात आहेत.