PCMC Municipal Election 2026 : भाजपच्या सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी, अजित पवारांचे टीकास्त्र
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 2, 2026 20:12 IST2026-01-02T20:10:51+5:302026-01-02T20:12:28+5:30
- महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडला; लोकशाहीत दादागिरी सहन करणार नाही; भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार

PCMC Municipal Election 2026 : भाजपच्या सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी, अजित पवारांचे टीकास्त्र
पिंपरी : आमच्यावरही बिनबुडाचे आरोप झाले होते. कोणावर आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत. मात्र, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २) येथे केली.
राष्ट्रवादी (अजित पवार)चे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळ फोडला. त्यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी (शरद पवार)चे शहराध्यक्ष तुषार कामठे, नाना काटे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, आमच्या सत्ताकाळात २०१७ पर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, ज्यांना मी पदे दिली होती, ते माझे अनेक सहकारी २०१७ नंतर मोदी लाटेमध्ये निघून गेले. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी ऑफ इंडिया’चा पुरस्कार मिळाला होता. त्या काळात आम्ही महापालिकेला कधीही कर्जात टाकले नाही. उलट ठेवी वाढवल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत जवळपास आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत; पण त्या बदल्यात काम तरी कुठे दिसत आहे?
‘रिंग’ करून निविदांची रक्कम फुगवली जाते...
पवार म्हणाले की, आज बनवलेले रस्ते काही दिवसांत उखडतात. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली कोट्यवधींची कामे काढली जातात. निविदांमध्ये कंत्राटदारांची ‘रिंग’ होते, दर फुगवले जातात. अनेक ठिकाणी २०-२० टक्क्यांचा फरक आहे. दुसरीकडे कमी पैशांत चांगले रस्ते तयार होतात, मग येथे एवढा खर्च का? एक किलोमीटरसाठी परवानगी घेतली जाते आणि चार किलोमीटरपर्यंत खोदाई केली जाते. माती टाकून बुजवली जाते, पुन्हा रस्ता केला जातो. यातून नागरिकांचा पैसा वाया जात आहे. शहरात २० हजार कुत्र्यांची नसबंदी झाली; पण कुत्रे चावण्याच्या १ लाख ७० हजार घटना नोंदवल्या गेल्या. यात मोठा भ्रष्टाचार आहे. पन्नास हजारांच्या टीव्हीसाठी दीड लाख रुपये खर्च केले; पण शाळांमध्ये इंटरनेटच नाही. गरिबांच्या पोरांचे शिक्षण स्मार्ट होण्याऐवजी पैसा वाया गेला.
दमदाटी करून बिनविरोध
पवार म्हणाले की, अर्ज भरलेल्या उमेदवारांचा सिनेस्टाइल पाठलाग करून माघार घ्यायला लावली. काहींना गाडीत बसवून धमकावले. कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. लोकशाहीत अशी दादागिरी सहन केली जाणार नाही. मी फक्त टीका करणारा नाही. भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार आहे. मला अजितदादा म्हणतात पण मी दादागिरी करत नाही.