PCMC Election 2026: महापालिका निवडणुकीत ३१७ महिला रिंगणात;नारीशक्तीची छाप पडणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:35 IST2026-01-06T14:34:15+5:302026-01-06T14:35:11+5:30
- ६४ अपक्ष महिला आजमावताहेत नशीब, खुल्या जागेवर सहा महिलांची लढत

PCMC Election 2026: महापालिका निवडणुकीत ३१७ महिला रिंगणात;नारीशक्तीची छाप पडणार का ?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एकूण ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तब्बल ३१७ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी सर्वाधिक महिलांना संधी दिली आहे. अपक्षांमध्येही ६४ महिलांचा समावेश आहे. ५२८ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २०८ महिलांनी माघार घेतली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण असल्याने १२८ पैकी ६४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे किमान ६४ महिला सभागृहात प्रवेश करणार हे निश्चित आहे. मात्र, खुल्या जागांवरूनही सहा महिला लढत असल्याने निकालानंतर महिलांची संख्या वाढू शकते. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी प्रभाग आणि जागा बदलली. पुरुष उमेदवारांनी घरातील महिलांना संधी दिली. काही माजी नगरसेविकांनी खुल्या जागांवरून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
भाजपकडून ६५ महिला उमेदवार
भाजपने १२८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, तीन उमेदवारांचे एबी फॉर्म उशिरा पोहोचल्याने ते अपक्ष लढत आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे. याशिवाय एका महिलेला खुल्या जागेवर संधी दिल्याने भाजपच्या एकूण ६५ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीकडून ६७ महिला उमेदवार
राष्ट्रवादी (अजित पवार) ने १२१ पैकी ६२ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ने १३ पैकी ५ महिला उमेदवार आहेत. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एका महिलेला खुल्या जागेवर उमेदवारी दिली आहे.
इतर पक्ष आणि अपक्ष
काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, आप, मनसे, वंचित, बसपा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सनय छत्रपती शासन, पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडी, नॅशनल रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आदी पक्षांनीही महिलांना संधी दिली आहे. अपक्ष १६६ उमेदवारांपैकी ६४ महिला आहेत.
प्रभाग ३० मध्ये २० महिला उमेदवार
सर्वाधिक २० महिला उमेदवार प्रभाग क्रमांक ३० (कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी) मध्ये आहेत. त्याखालोखाल प्रभाग १९ (आनंदनगर-भाटनगर-एम्पायर इस्टेट) मध्ये १७ महिला. प्रभाग ९, १६ आणि ३२ मध्ये प्रत्येकी १६, प्रभाग ३१ मध्ये १४, प्रभाग १३ मध्ये १५ तर प्रभाग ८, १७ आणि २२ मध्ये प्रत्येकी १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
प्रमुख पक्षनिहाय महिला उमेदवार
पक्ष - एकूण जागा - महिला उमेदवार
भाजप - १२८ - ६२
राष्ट्रवादी (अजित पवार) - १२१ - ६२
शिंदेसेना - ५७ - ३०
काँग्रेस - ५५ - १८
राष्ट्रवादी (शरद पवार) - १३ - ५
उद्धवसेना - ४८ - १९
वंचित - ३४ - १५
आप - १८ - १०
मनसे - १२ - ६
बसप - १७ - ३
अपक्ष - १६६ - ६४