PCMC Election 2026:‘हायव्होल्टेज’ लढत;मागील वेळी हजाराच्या आत मताधिक्य असलेल्या २३ जागा यंदा ‘हॉटलिस्ट’वर
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 8, 2026 10:41 IST2026-01-08T10:40:07+5:302026-01-08T10:41:51+5:30
- सर्वच पक्षांचे विशेष लक्ष; मतांचे गणित थोडेसे बदलले तरी सत्ता समीकरणांची उलथापालथ शक्य

PCMC Election 2026:‘हायव्होल्टेज’ लढत;मागील वेळी हजाराच्या आत मताधिक्य असलेल्या २३ जागा यंदा ‘हॉटलिस्ट’वर
पिंपरी : महापालिका निवडणुकीत यंदा २०१७ मधील अटीतटीच्या लढती झालेल्या प्रभागांंवर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील निवडणुकीत एक हजारापेक्षा कमी मताधिक्याने २३ जागा निवडून आल्या होत्या. तेथे मतांचे गणित थोडेसे बदलले तरी सत्तासमीकरणांची उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने या जागा यंदाच्या निवडणुकीत ‘टर्निंग पॉइंट’ ठरण्याची चिन्हे आहेत.
मागील वेळी २३ अटीतटीच्या जागांपैकी १० जागा राष्ट्रवादी, ९ जागा भाजप, तर ४ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, त्यावेळी कमी मताधिक्याने विजयी ठरलेल्यांपैकी अनेक नगरसेवकांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला, तर भाजपमधील विद्यमानांची यंदा तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांचा कल, उमेदवार बदल आणि पक्षांतर याचा थेट परिणाम या प्रभागांवर होणार आहे. यंदा या अटीतटीच्या जागा महापालिकेतील सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे ठरविण्यात निर्णायक भूमिका बजावतील.
आमदार महेश लांडगे यांच्या बंधूंचा पराभव
भोसरीतील ५-ड या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा ३३६ मतांनी पराभव केला होता, तर ८-ड मध्ये राष्ट्रवादीच्याच विक्रांत लांडे यांनी शिवसेनेवर ३९७ मतांची आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांचा ७८३ मतांनी पराभव केला होता. यावेळी कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर चांदगुडे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीसाठी कसोटी
भाजपच्या अश्विनी जाधव २-अ मधून केवळ ४८ मतांनी विजयी झाल्या होत्या. सध्या त्या राष्ट्रवादी (अजित पवार)कडून निवडणूक लढवत आहेत. १४-ब आणि १४-क या दोन्ही जागांवर अवघ्या ५५ मताधिक्य होते. १४-ब (५५ मते), २३-अ (९७ मते), २४-अ (८७० मते) असे मताधिक्य होते. तेथे आणि २५-अ, २५-क या शिवसेनेच्या जागांवरही यंदा कडवी झुंज आहे. भाजपच्या २३-अ मध्ये मनीषा पवार केवळ ९७ मतांनी विजयी झाल्या होत्या, तर १-ब, १०-ब, ११-क, १३-अ, २०-क, २८-ब, ३०-ब या भाजपच्या जागाही कमी मताधिक्याने आल्या होत्या. तेथे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीची कसोटी आहे.
पक्षांतर आणि तिकीट कापल्याचा फटका?
मागील निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष बदलल्याने मतदारांचा विश्वास टिकेल की नाही, हा प्रश्न आहे. दुसरीकडे, काही ठिकाणी जुने चेहरे डावलण्यात आल्याने नाराज बंडखोर आणि अपक्ष समीकरणे बिघडवू शकतात. त्यामुळे या २३ जागांवर केवळ पक्ष नव्हे, तर उमेदवाराची वैयक्तिक ताकद, स्थानिक कामे आणि नाराजी-समाधानाचे राजकारण निर्णायक ठरणार आहे.
प्रभाग - विजयी - पराभूत - मतांचा फरक
१- ब : स्वीनल म्हेत्रे (भाजप) - स्वाती साने (राष्ट्रवादी) - १९७
२-अ : अश्विनी जाधव (भाजप - रूपाली आल्हाट (शिवसेना) - ४८
५ -ड : अजित गव्हाणे (राष्ट्रवादी) - सचिन लांडगे (भाजप) -
८-ड : विक्रांत लांडे (राष्ट्रवादी) - तुषार सहाणे (शिवसेना) - ३९७
१०-ब : केशव घोळवे (भाजप)- नारायण बहिरवाडे (राष्ट्रवादी) - १३०
१०-क : मंगला कदम (राष्ट्रवादी) - सुप्रिया चांदगुडे (भाजप) - ७८३
११-क : संजय नेवाळे (भाजप) - सचिन सानप (शिवसेना) - ७०८
१२-अ : प्रवीण भालेकर (राष्ट्रवादी) - सुरेश म्हेत्रे (भाजप) - ६३८
१३-अ : कमल घोलप (भाजप)- अणू गवळी (शिवसेना) - ४२८
१३ -क : सुमन पवळे (राष्ट्रवादी) - सुलभा उबाळे (शिवसेना) - २८१
१४-अ : जावेद शेख (राष्ट्रवादी) - कैलास कुटे (भाजप) - ६९२
१४-ब : मीनल यादव (शिवसेना) - तेजस्विनी दुर्गे (भाजप) - ५५
१४-क : वैशाली काळभोर (राष्ट्रवादी) - ऊर्मिला काळभोर (शिवसेना) - ५५
१५-अ : राजू मिसाळ (राष्ट्रवादी) - धनंजय काळभोर (भाजप) - ६७०
१६ - ब : प्रज्ञा खानोलकर (राष्ट्रवादी) - छाया राऊत (भाजप) - २४४
२०-क : सुजाता पालांडे (भाजप) - संगीता सुवर्णा (राष्ट्रवादी ) - ३४७
२३-अ : मनीषा पवार (भाजप) - विमल जगताप (शिवसेना) - ९७
२४-अ : सचिन भोसले (शिवसेना) - जयदीप माने (भाजप) - ८७०
२५-अ : अश्विनी वाघमारे (शिवसेना) - सोनाली ओव्हाळ (राष्ट्रवादी ) : ५३३
२५-क : राहुल कलाटे (शिवसेना) - संदीप पवार (राष्ट्रवादी) - ८३७
२८-ब : निर्मला कुटे (भाजप) - अनिता काटे (राष्ट्रवादी) - ५७९
३०-अ : राजू बनसोडे (राष्ट्रवादी) - चंद्रकांता सोनकांबळे (भाजप) - ७९४
३०-ब : आशा धायगुडे (भाजप) - प्रतिभा जोशी (राष्ट्रवादी) - ५३८