PCMC Election 2026: नऊ वर्षे कोठे होता? प्रश्न सोडवणार कधी? उमेदवारांना मतदारांचा सवाल
By विश्वास मोरे | Updated: January 6, 2026 14:18 IST2026-01-06T14:14:22+5:302026-01-06T14:18:13+5:30
- वाकड, दिघी रोडची वाहतूक कोंडी, समाविष्ट गावांतील टँकर, प्राधिकरण महापालिकेतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, रेड झोन हद्द कमी होणार कधी? पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी प्रदूषण यावर उपाय कधी?

PCMC Election 2026: नऊ वर्षे कोठे होता? प्रश्न सोडवणार कधी? उमेदवारांना मतदारांचा सवाल
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या सुरू झाल्या आहेत. मतदारांशी संवाद सुरू आहे. प्रचाराला गेल्यानंतर सुज्ञ नागरिक ‘नऊ वर्षे कोठे होता?’ असा प्रश्न उमेदवारांना विचारत आहेत. वाहतूक कोंडी कधी सोडिवणार, नियमित पाणीपुरवठा कधी करणार, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेड झोन हद्द कधी कमी होणार, पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणातून मोकळा श्वास कधी घेणार? असे प्रश्न विचारत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक प्रश्न मागील पानावरून पुढील पानावर आले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यश आलेले नाही. वर्ष १९८६ पासून काँग्रेस त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पंधरा वर्षे आणि त्यानंतर भाजपची पाच वर्षे एकहाती सत्ता असताना शहरातील प्रश्न सोडविण्यात तत्कालीन सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. त्यामुळे मतदार उमेदवारांना प्रश्न विचारत आहेत.
उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न
वाकड, किवळे, मोशीतील वाहतूक कोंडी सोडविणार कधी?
नागरीकरण वाढत असताना वाहतूक कोंडीही वाढली आहे. शहरामध्ये काही वर्षांपूर्वी प्रशस्त असणारे रस्ते, पदपथ सुशोभीकरणाच्या नावाखाली अरुंद केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गासह पुणे-बंगळुरू महामार्ग, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाकड, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी परिसरात तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
कचरा डेपो विस्तार लांबला?
शहरातील कचरा एकत्रित करून मोशी येथील डेपोत नेला जातो. येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. कचरा डेपोचा विस्तार थांबला आहे. मोशी, भोसरी, चऱ्होलीत कचऱ्याची दुर्गंधी येत आहे.
जाधववाडी, चऱ्होलीत अनियमित पाणी, योजना रखडल्या
वेळीच पाण्याचे नियोजन न झाल्याने २०१८ पासून दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून रखडला आहे. भामा-आसखेड प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे गेली सात वर्षे दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, किवळे, रावेत, जाधववाडी, चऱ्होली या भागात पाणीपुरवठा होत आहे.
प्राधिकरण आणि काळेवाडीतील बांधकामांचे नियमितीकरण
काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवड, चिखली, भोसरी या प्राधिकरण हद्दीतील बांधकामे नियमित झालेली नाहीत. महापालिका क्षेत्रातीलही बांधकामे नियमित झालेली नाहीत. ती कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार कधी?
शहरामध्ये पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन प्रमुख नद्या असून, त्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न कायम आहे. महापालिका क्षेत्रातील ३० टक्के रसायनयुक्त पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते. कारवाई होत नाही. पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषणावर उपाय होणार कधी? प्रश्न कायम आहे.
तळवडे, चक्रपाणी वसाहतीमधील रेड झोन हद्द कोण कमी करणार?
देहूरोड, दिघी मॅक्झिन, तसेच देहूरोड दारूगोळा कारखान्यापासून रेड झोन हद्द निश्चित केली आहे. किवळे, विकासनगर, मामुर्डी, यमुनानगर, तळवडे, चक्रपाणी वसाहत, दिघी, चिखली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. तेथील रेड झोनची हद्द कमी कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
झोपडपट्टी पुनर्विकास होणार कधी?
शहरात कामगार अधिक आहेत. त्यामुळे गोरगरीब कामगार झोपडपट्ट्यांत राहतात. त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. हा विकास होणार कधी? गती कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.