PCMC Municipal Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का; भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध;भाजपच्या सुप्रिया चांदगुडे बिनविरोध
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 2, 2026 17:08 IST2026-01-02T17:08:13+5:302026-01-02T17:08:45+5:30
Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026: भाजपचे रवी लांडगे ही बिनविरोध झालेत. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आहे

PCMC Municipal Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का; भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध;भाजपच्या सुप्रिया चांदगुडे बिनविरोध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला. प्रभाग सहामधील उमेदवाराने अर्ज न भरल्याने भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आल्यानंतर आता प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडीमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या 'ब' जागेसाठी भाजपकडून सुप्रिया चांदगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षा भालेराव यांना उमेदवारी दिली. त्यांनी अर्जही दाखल केला होता. परंतु, शुक्रवारी माघारीच्या मुदतीत भालेराव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
मागच्या निवडणुकीत पराभव...
सुप्रिया चांदगुडे यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण, अपक्ष रेणुका भोजने आणि रोहिणी रासकर उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे प्रभाग १० ब मधून सुप्रिया चांदगुडे बिनविरोध निवडून आल्या आहेत. सुप्रिया चांदगुडे या उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या भावजय आहेत. सुप्रिया चांदगुडे २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यांना ९ हजार ९३३ मते पडली होती. या निवडणुकीत मात्र त्यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्या याआधी भाजपचे रवी लांडगे ही बिनविरोध झालेत. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आहे.
प्रभाग दहामध्ये आता भाजपचे तीन उमेदवार
प्रभाग क्रमांक दहा मधील सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने आता भाजपचे तीन उमेदवार रिंगणात असणार आहेत. विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे, माजी महापौर मंगला कदम यांचे चिंरजीव कुशाग्र कदम आणि माजी उपमहापौर तुषार हिंगे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निलीमा पवार, संदीप चव्हाण, सतिश क्षीरसागर हे उमेदवार असणार आहेत.