PCMC Election 2026: रहाटणी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त; निवडणूक भरारी पथकाने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:04 IST2026-01-13T15:03:59+5:302026-01-13T15:04:45+5:30
भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

PCMC Election 2026: रहाटणी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त; निवडणूक भरारी पथकाने केली कारवाई
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. सोमवारी (दि. १२ जानेवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत आहेत.
सोमवारी (दि. १२ जानेवारी) रात्री १०.२३ वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफएसटी भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये १९ वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे. या मशीन पथकाने जप्त केल्या आहेत.