निवडणुकीत सरशीसाठी उमेदवारांचा ग्रह-नक्षत्र जुळविण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:11 IST2025-11-10T16:11:02+5:302025-11-10T16:11:28+5:30
- तळेगावला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेसह, कार्यालयाची जागा, प्रचाराचा आरंभ यासाठी इच्छुक घेताहेत ज्योतिष, अंकशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला

निवडणुकीत सरशीसाठी उमेदवारांचा ग्रह-नक्षत्र जुळविण्यावर भर
- विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा रंगात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचार मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये राजकीय रणनीतीसह ‘ग्रह-नक्षत्रांची’ही सरशी पाहायला मिळत आहे. कारण, उमेदवारी जाहीर करण्यापासून ते कार्यालयाची जागा, प्रचाराचा आरंभ आणि बॅनर-पोस्टरचे डिझाईन यापर्यंत प्रत्येक गोष्टीत ज्योतिष आणि अंकशास्त्राचा सल्ला घेतला जात आहे.
तळेगावातील नामांकित ज्योतिषी, वास्तु तज्ज्ञ आणि अंकशास्त्र जाणकार यांच्या कार्यालयात सध्या इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. कोणत्या तारखेला प्रचार सुरू करावा, कोणत्या रंगाचे बॅनर लावावेत, कार्यालयाची खुर्ची कोणत्या दिशेला ठेवावी, शुभ अंक कोणता, वाहनाचा नंबर कोणत्या कुलसूत्राशी जुळतो, अशा प्रश्नांचा भडीमार सुरू आहे.
कार्यालयांची ‘दिशा’ही बदलली
काही इच्छुकांनी तर वास्तुशास्त्रानुसार कार्यालयांच्या जागा बदलण्यापर्यंतची पावले उचलली आहेत. कोणी दक्षिणमुखी जागा टाळत आहे तर कोणी ‘ईशान्य’ दिशेला प्रवेशद्वार असलेली जागा शोधत आहे. काहींनी कार्यालयातील मांडणी बदलून खुर्च्या, टेबले आणि आसनव्यवस्था शुभ मानल्या जाणाऱ्या दिशेत हलवली आहे.
शुभ मुहूर्तानुसार प्रचाराचा प्रारंभ
प्रचारासाठी रॅली, पदयात्रा किंवा बैठकांसाठी दिवस व वेळ याही ‘शुभ मुहूर्ता’नुसार ठरविल्या जात आहेत. तारे-नक्षत्र जुळल्यानंतरच ‘जयघोष’ होणार, अशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे.
अंकशास्त्राची धूम :
- यंदा अंकशास्त्राचा प्रभावही लक्षणीय आहे.
- काही जणांनी तर स्वतःच्या नावाची अक्षरे बदलण्याच्याही चर्चा केल्या आहेत.
- “निवडणूक लढवायची की ग्रहांचा मेळ बसवायचा?” असा सूर अनेकदा ऐकू येतो.
- तर काहीजण म्हणतात, “फक्त ग्रह-नक्षत्र असून उपयोगाचे नाही, मतदारांचा आशीर्वाद असणे गरजेचे आहे.”
तज्ज्ञांचे मत
एका ज्योतिष तज्ज्ञाचे मत असे आहे की, ‘ग्रहांचा परिणाम मनोबलावर होतो. मनोबल चांगले असेल तर निर्णयही स्थिर आणि प्रभावी होतात. त्यामुळे शुभ वेळेत केलेला संकल्प यशाकडे नेतो.’
उमेदवारांचे भाग्यांक, नावाचा अंक, पक्षचिन्हाचा भाव, मतदानाचा दिवस यांचे ‘समीकरण’ जुळविण्यावर विशेष भर दिला जात आहे. काही जणांनी तर स्वतःच्या नावाची अक्षरे बदलण्याच्याही चर्चा केल्या आहेत. - स्वानंद कुलकर्णी, अंकशास्त्र तज्ज्ञ