मतदारयादीतील घोळ संपता संपेना;शहरातील तीन लाख ६३ हजार मतदारांचा घर क्रमांकच गायब
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 27, 2025 15:07 IST2025-11-27T15:05:22+5:302025-11-27T15:07:17+5:30
- प्रारूप मतदारयादीतील घोळ संपता संपेना: महत्त्वाचा तपशीलच नाही; संभ्रम कायम; निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेवर प्रश्नचिन्ह; त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी

मतदारयादीतील घोळ संपता संपेना;शहरातील तीन लाख ६३ हजार मतदारांचा घर क्रमांकच गायब
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील १७लाख १३ हजार ८९१ मतदारांपैकी तब्बल तीन लाख ६३ हजार ९३९ मतदारांचे घरक्रमांकच नोंद झालेले नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदार ओळख व मतदान केंद्राशी जोडणारा सर्वांत महत्त्वाचा तपशीलच यादीत नाही. त्यामुळे मतदार याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेकडून आणि निवडणूक विभागाकडून मागील काही महिन्यांत मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर पत्ते गायब असणे म्हणजे त्या मोहिमांचे परिणाम कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा अचूक तपशील मिळावा, यासाठी तातडीने पुन्हा पडताळणी करून त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणावर मतदार वंचित राहण्याची भीती नागरिक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रारूप यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती तपासून आवश्यक बदल सुचवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कमी मतदानाचा बसणार सर्वच पक्षांना फटका...
मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याने प्रत्येक प्रभागाक कमी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी मतदान झाल्यास कोणत्याही एका पक्षाला फायदा होत नाही; उलट सर्वच पक्षांच्या गणितावर परिणाम होऊ शकतो. कारण कमी मतदानात निश्चित मतदास्च बाहेर पडतात. त्यामुळे फक्त पक्षचिन्ह आणि उमेदवारांलाच मतदान होते. त्यामुळे त्याचा फायदा मोठ्या पक्षांनाच होतो.
महाविकास आघाडीसह भाजप, राष्ट्रवादीकडूनही हरकती
प्रशासनाकडून मतदारयादी अद्ययावत केल्याचे दावे केले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरक्रमांक नसणे ही मोठी चूक आहे. याबाबत शहरातील महाविकास आघाडी तसेच भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांनीही हरकती घेत तक्रारी नोंदवल्या आहेत.
सोमवारी (दि. २४) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने व 3 भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी भेट घेतली. चुकीच्या याद्या तयार करण्यामागे निवडणूक विभागाचा ढिसाळपणा नसून भाजपचा अप्रत्यक्षरीत्या हात आहे, अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.
मतदारयादीतून नावच गहाळ
प्रश्न कायम गेल्या काही निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर मतदार आपले मताधिकार बजावू न शकल्याची तक्रार नोंदवत होते. अनेकांना मतदानाच्या दिवशीच आपले नाव यादीत नसल्याचे समजते, ज्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. "प्रारूप यादीत चुका दुरुस्त करण्याचा कालावधी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने असे होत असल्याचे नागरिकांचे म्हणे आहे.
तब्बल नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांवर पत्ते गायब
शहरातील नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे पत्ते गायब आहेत. त्यात प्रभाग २१ मध्ये तब्बल ३३ टक्के मतदारांचे धरक्रमांक नोंद झालेले नाहीत. प्रभाग १० मध्ये २८ टक्के, प्रभाग ३० मध्ये २७ टक्के, तर प्रभाग ४ मध्ये २९ टक्के मतदारांच्या घराचा पत्ता नसल्याचे मतदार यादीतून निदर्शनास आले आहे. तसेच प्रभाग १९, २०, २९, ५ आणि ६ या प्रभागांतही २६ टक्क्यांहून अधिक मतदारांचे पत्ते यादीत नाहीत.