बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या, बनावट नियुक्तिपत्रे; नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा उद्योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:28 IST2026-02-25T15:28:35+5:302026-02-25T15:28:47+5:30
- आर्थिक व्यवहार न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या, बनावट नियुक्तिपत्रे; नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा उद्योग
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अधिकृत नोकरभरती प्रक्रिया सुरू नसतानाही काही अज्ञात व्यक्तींनी शहरातील तरुणांना बनावट नियुक्तिपत्रे देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक बेरोजगार तरुण आर्थिक फसवणुकीचे बळी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही काही व्यक्तींनी महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तिपत्रे तयार केली आहेत. या पत्रांमध्ये उमेदवारांची निवड झाल्याचे नमूद करत नियुक्तीची तारीखही १ एप्रिल २०२६ दिली आहे. तसेच पत्रात १६ हजार रुपये पगार आणि १६ हजार रुपये महागाई भत्ता असा उल्लेख करून तीन महिन्यांचा चाचणी कालावधी असल्याचे नमूद केले आहे.
याशिवाय, रुजू होताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अशी अट आहे. ही नियुक्ती कायमस्वरूपी असून, महापालिकेच्या सेवा नियमावलीच्या अधीन राहील, असेही नियम पत्रात नमूद केले आहे. नियुक्तिपत्रासोबत रुजू होण्याची तारीख आणि विभागाचे नावही देण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीची ओढ लक्षात घेता काही भामट्यांनी ही संधी साधल्याचे बोलले जात आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याचे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे. नोकरभरतीची प्रक्रिया असेल तर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जाते आणि कोणत्याही प्रकारचे रोख व्यवहार किंवा मध्यस्थांमार्फत पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे अशा फसवणुकीपासून तरुणांनी सावध राहावे. - मनोज लोणकर, सहआयुक्त, महापालिका