PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण? भाजपमधील 'या' नावांची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:39 IST2026-01-23T10:38:40+5:302026-01-23T11:39:57+5:30
Pimpri-Chinchwad Mayor: पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण? भाजपमध्ये इच्छुकांची चढाओढ

PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण? भाजपमधील 'या' नावांची जोरदार चर्चा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद यंदा खुल्या (सर्वसाधारण) गटासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपच्या ८५ नगरसेवकांपैकी कोणाला महापौरपदाची संधी मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पक्षांतर्गत लॉबिंग आणि वरिष्ठ पातळीवरील भेटीगाठी वाढल्या आहेत.
महापालिकेच्या स्थापनेपासून १९८२ पासून आतापर्यंत सात महिला आणि १९ पुरुषांनी महापौरपद भूषविले आहे. यंदा २७व्यांदा हे पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. २०१७ मध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत दोन पुरुष आणि एका महिला नगरसेविकेला महापौरपदाची संधी देण्यात आली होती.
महापालिकेत भाजपचे ८४ निवडून आलेले नगरसेवक असून, एका पुरस्कृत नगरसेवकासह एकूण संख्या ८५ आहे. यामध्ये ४२ पुरुष नगरसेवक आणि पुरस्कृतासह ४३ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे यंदा अनुभवी नगरसेवकाला संधी द्यायची की नवख्या चेहऱ्यावर विश्वास दाखवायचा, यावर पक्षात चर्चा सुरू आहे.
माजी महापौर नितीन काळजे आणि राहुल जाधव यांना यापूर्वी संधी मिळाल्याने त्यांची नावे पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मात्र, तिसऱ्यांदा निवडून आलेले निष्ठावंत नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, विद्यमान उपमहापौर तुषार हिंगे, आमदार शंकर जगताप यांचे निकटवर्तीय ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप तसेच प्रभाग क्रमांक १९ मधील मंदार देशपांडे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले राहुल कलाटे, राजू मिसाळ आणि प्रशांत शितोळे यांनाही इच्छुक मानले जात आहे. महापौरपदासाठीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होणार असून, पुढील काही दिवसांत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.