PCMC Election Results 2026 : राहुल कलाटे , सिद्धार्थ बनसोडे , विश्वजीत बारणे...; मतमोजणीत भाजपचे 'हे' उमेदवार आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:14 IST2026-01-16T11:12:18+5:302026-01-16T11:14:53+5:30
- राष्ट्रवादीसह इतर पक्षांना काही ठिकाणी संमिश्र यश मिळाले आहे.

PCMC Election Results 2026 : राहुल कलाटे , सिद्धार्थ बनसोडे , विश्वजीत बारणे...; मतमोजणीत भाजपचे 'हे' उमेदवार आघाडीवर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी (दि. १६) सकाळी टपाल मतांच्या मोजणीने सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यातील टपाल मतांमधून भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. तर राष्ट्रवादीसह इतर पक्षांना काही ठिकाणी संमिश्र यश मिळाले आहे.
एकूण १२८ जागांसाठी ही निवडणूक होत असून, टपाल मतांमधील कल पाहता प्रमुख पक्षांची प्राथमिक ताकद स्पष्ट होऊ लागली आहे. अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे राहुल कलाटे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आघाडीवर आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना पिछाडीचा सामना करावा लागत आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी आघाडी घेतली आहे.
इतर प्रभागांमध्येही निकालांचे संकेत मिळू लागले असून, मारुती भापकर यांनी आपल्या प्रभागात आघाडी मिळवली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे (राष्ट्रवादी) या पिछाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक १ मधून यश साने यांनी आघाडी घेतल्याची माहिती आहे.
टपाल मतांनंतर आता ईव्हीएम मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम निकालांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.