PCMC Election 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटी; खासगी कंपन्या, कारखाने यांनी कामकाज सुरु ठेवल्यास कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:03 IST2026-01-14T10:02:46+5:302026-01-14T10:03:50+5:30
PCMC Election 2026 औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हाॅटेल्स, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर्स, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी, कामगार उपायुक्तांच्या सूचना

PCMC Election 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटी; खासगी कंपन्या, कारखाने यांनी कामकाज सुरु ठेवल्यास कारवाई होणार
पिंपरी : मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवारी (दि.१५) जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तरीही काही खासगी कंपन्या, कारखाने व आस्थापने यांनी कामकाज सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.
मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही सुटी लागू राहणार आहे. औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हाॅटेल्स, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर्स, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास तेथे दोन ते तीन तासांची सवलत द्यावी. कोणतीही कंपनी किंवा आस्थापना मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी न देता कामावर बोलावत असल्याचे आढळल्यास, संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी अपर कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी केले आहे.