महायुतीचे काहीच ठरेना, इच्छुकांची घालमेल संपेना; सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 13, 2025 15:27 IST2025-11-13T15:25:27+5:302025-11-13T15:27:08+5:30

- महाविकास आघाडीतही बिघाडीची चिन्हे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरणे; आरक्षण सोडतीनंतरचे चित्र;

Nothing has been decided for the grand alliance, the confusion of those interested has not ended | महायुतीचे काहीच ठरेना, इच्छुकांची घालमेल संपेना; सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला

महायुतीचे काहीच ठरेना, इच्छुकांची घालमेल संपेना; सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी (दि. १२) आरक्षण सोडत जाहीर होताच, सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला आहे. महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही, तर महाआघाडीच्या गोटातही बिघाडीची चिन्हे आहेत. मात्र शहरात हालचालींना वेग आला आहे.

भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे महायुतीतील तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र हालचाली करत आहेत. महायुतीने एकत्र लढायचे की स्वतंत्ररित्या हे अद्याप ठरले नसल्याने इच्छुकांना स्पष्ट दिशा मिळालेली नाही. त्यामुळे उमेदवार निश्चितीचा गोंधळ कायम आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते पॅनेलची जुळवाजुळव करत आहेत, तर काही ठिकाणी महायुतीच्या जागा वाटपाची निश्चिती होईल, या अपेक्षेने थांबले आहेत. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्या स्वतंत्र हालचाली सुरू असल्याने जागावाटपांवरून बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

हायब्रीड युती की सगळ्या जागा लढवणार?

महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील जागावाटपाचा प्रश्न कायम आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हायब्रीड युती करू, असे सांगितले होते, तर भाजपचे शहर निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी पक्ष १२८ जागांवर उमेदवार देण्यास सज्ज असल्याचे जाहीर करताच, इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली. भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर कोणीही शंका घेत नसले तरी, शिंदे गट आणि अजित पवार गट यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल का, हा प्रश्न आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच आहे, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे विधान चर्चेला खतपाणी घालणारे ठरले आहे. 

राष्ट्रवादीचा प्रयोग यशस्वी होईल का?

शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे स्थानिक कार्यकर्ते काही विशिष्ट भागात सक्रिय झाल्याने, उमेदवारीबाबत अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जर एकत्र येण्याचा प्रयोग यशस्वी झाला, तर पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. २०१७ ला शहरातील अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. काही ठिकाणी अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवार पडले होते. याचीच गोळाबेरीज करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह अजित पवार यांच्याकडे धरला. त्याला पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींची चर्चा आहे. 

दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी

शिवसेनेचे दोन्ही गटसुद्धा स्वतंत्ररित्या मोर्चेबांधणी करत आहेत. काही ठिकाणी हे दोन्ही गट एकाच प्रभागात प्रचार मोडमध्ये उतरल्याने स्थानिक पातळीवर चढाओढ वाढली आहे. पॅनेलची रचना, उमेदवारांची नावे आणि सोशल मीडियावरील प्रचार यामुळे कार्यकर्त्यांत ‘मीच अधिकृत उमेदवार’ अशी चढाओढ दिसून येत आहे.

कुठेच नसणाऱ्या काँग्रेसचीही तयारी

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. २०१७ मध्ये एकही नगरसेवक निवडून न आणू शकलेल्या काँग्रेसने यंदा नव्या जोमात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पक्षाने गांभीर्य दाखवले आहे. युवा चेहऱ्यांसोबत काही माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा मैदानात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

Web Title : गठबंधन अनिश्चितता से उम्मीदवार चयन में देरी, दावेदारों में बेचैनी।

Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनाव में गठबंधन की अनिश्चितता से उम्मीदवार चयन में देरी हो रही है। महायुति और महाआघाडी में आंतरिक असहमति है। भाजपा, शिवसेना गुट और एनसीपी गुट स्वतंत्र रूप से आगे बढ़ रहे हैं। कांग्रेस नए और अनुभवी उम्मीदवारों के साथ पिछले परिणामों को सुधारने का लक्ष्य लेकर तैयारी कर रही है।

Web Title : Alliance uncertainty delays candidate selection, causing unrest among aspirants.

Web Summary : Pimpri-Chinchwad's upcoming election sees alliance uncertainties delaying candidate selections. Mahayuti and Mahaaghadi face internal disagreements. BJP, Shiv Sena factions, and NCP factions move independently. Congress prepares, aiming to improve from past results with new and experienced candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.